सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) याना उमेदवारि देण्यात आल्यानंतर शशिकांत शिंदे यांचे प्रथमच जिल्ह्यात जोरदार स्वागत करण्यात आलं. सातारा व पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील शिंदेवाडी परिसरात कार्यकर्त्यांनी हार घालून शशिकांत शिंदे यांचं स्वागत केलं. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. या भव्य दिव्य शक्तीप्रदर्शनामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झालं.
शरद पवार यांचे आशीर्वाद घेऊन शशिकांत शिंदे मुंबईहून साताऱ्याला निघाले. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून साताऱ्याच्या वेशीवरच हार- पुष्पगुच्छ देऊन शशिकांत शिंदे यांचे स्वागत करण्यात आलं. हजारोच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त्ये त्याठिकाणी उपस्थित होते. महिलांनी शशिकांत शिंदे यांचे औक्षण केलं आणि हार घालून त्यांचे अभिनंदन केलं. संपूर्ण परिसरात राष्ट्रवादीमय वातावरण पाहायला मिळालं आणि शरद पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा उत्साह आणि जोश पाहायला मिळाला.
दरम्यान, यशवंतराव चव्हाण साहेब आणि पवार साहेबांचा सातारा जिल्हा अबाधित राहील अशी प्रतिक्रिया शशिकांत शिंदे यांनी दिली. शाहू- फुले – आंबेडकरांना मानणाऱ्या सातारा जिल्ह्याने नेहमीच पुरोगामी विचार जपला आहे. त्यामुळे सर्व जनतेच्या मदतीने सातारा जिल्हा पुन्हा एकदा इतिहास घडवेल असा विश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. सातारा जिल्ह्याचा विकास आणि स्वाभिमान उभा करण्याचा माझा प्रयत्न असेल. जिल्यातील बेरोजगारी, आयटी हब, औद्योगिक विकास स्थानिकांचा रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न हेच आपलं पुढचं ध्याय असेल असं शशिकांत शिंदे यांनी सांगितलं.