सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुक २०२४ (Satara Lok Sabha Elections 2024) ही चांगलीच चुरशीच्या मतदानाने पार पडली. या निवडणुकीत महायुतीकडून भाजप खासदार उदयनराजे भोसले तर महाविकास आघाडीकडून शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे हे मैदानात उतरले. दोघांच्यामध्ये काटे कि टक्कर पहायला मिळाली. जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडल्यानंतर आता प्रत्यक्ष निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले असताना निकालापूर्वीच खंडाळा तालुक्यात शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर झळकले आहेत. पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्ग लगतच बॅनर लागल्याने या बॅनरची चांगलीच चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
सातारा लोकसभेसाठी महायुतीकडून जिल्ह्यात कुणाला उमेदवारी दिली जाणार? याबाबत सस्पेन्स ठेवण्यात आला होता. शेवटी महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे यांना लोकसभेचे उमेदवारी दिलयानंतर उदयनराजे भोसले यांना महायुतीकडून उमेदवारी देण्यात आली. मात्र, उमेदवारीसाठी उदयनराजेंना दिल्लीत ठाण मांडून बसावे लागले होते. जिल्ह्यातील शशिकांत शिंदे व उदयनराजे भोसले हे दोन्ही उमेदवार एकास एक असल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती.
या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले होते. निवडणुकीत कोण बाजी मारणार? याबाबत शक्यता वर्तवल्या जाऊ लागल्या असताना खंडाळा तालुक्यात महामार्गालगत शशिकांत शिंदे यांच्या खासदारपदी विजयी झाल्याचे अभिनंदन पर बॅनर त्यांच्या समर्थकांकडून लावण्यात आले आहेत. शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांना विजयाची खात्री असल्याने त्यांनी निकालापूर्वीच हे बॅनर लावले असल्याने याची चांगलीच चर्चा जिल्हाभर सुरु झाली आहे.
नेमके कुणी लावले बॅनर?
राष्ट्रवादी काँग्रेस औद्योगिक सेलचे जिल्हाध्यक्ष बंडू ढमाळ व त्यांच्या सहकार्यांनी खंडाळा येथे हे बॅनर झळकवले आहेत. त्यामुळे महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह सातारकरांचे ते खास लक्ष वेधून घेत आहेत. लोकसभा निकालाला अजून काही दिवस बाकी आहेत. निकालाबाबत मात्र, लोकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे. त्यातच खंडाळ्यात विजयाचे बॅनर झळकल्याने चर्चेला उधाण आले आहे.
गावागावात लागल्या पैजा
लोकसभा निवडणुकीसाठी मतदान केल्यानंतर कोण जिंकणार? याबाबत सातारा जिल्ह्यात काही गावातील कार्यकर्त्यांमध्ये पैजा लावण्यात आल्या आहेत. तर गावातील मुख्य चौकामध्ये सायंकाळच्यावेळी कोण उमेदवार निवडून येणार? याचीच चर्चा रंगत आहे.
बॅनरमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापणार
सातारा लोकसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यातील उमेदवारांनी प्रचारात चांगलाच धुरळा उडवून दिला. महायुतीचे उमेदवार उदयनराजेंनी तर आपणच जिंकणार असे सांगत जिल्ह्यातील गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत खात्री पटवून दिली. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील उमेदवार शशिकांत शिंदे यांनी देखील गावागावात लोकांच्या गाठीभेटी घेत शेतकरी, काबाडकष्ट करणाऱ्यांसोबत संवाद साधला. आता निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर जिल्ह्यातील निवडणुकीचे वातावरण शांत झाले होते. मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, आता शशिकांत शिंदेंच्या विजयाच्या दाव्याचे लागलेल्या बॅनरमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापणार हे नक्की!
मंगळवारी 4 जून रोजी प्रत्यक्ष मतमोजणी
सातारा लोकसभा मतदार संघात 7 मे 2024 रोजी शांततेत व सुरळीतपणे मतदानाची प्रक्रिया पार पडली. या मतदान प्रक्रियमध्ये वृद्ध, तरुणांनी, नवमतदार, नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. यामध्ये 18 लाख 89 हजार 740 मतदारांपैकी 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये सर्वाधिक मतदान 257 कोरेगाव विधानसभा मतदारसंघात 67.59 टक्के इतके झाले. तर सर्वात कमी मतदान 261- पाटण विधानसभा मतदार संघात 56.95 टक्के इतके झाले.आता मंगळवार दि. 4 जून रोजी प्रत्यक्ष मतमोजणी केली जाणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.