अभयसिंहराजे लोकप्रियच नेते होते…, शरद पवारांनी कधीही हस्तक्षेप केला नाही; मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या आरोपांवर आमदार शिंदेंचं प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinh Bhonsle) यांनी काल कराड येथे खासदार शरद पवार यांच्यामुळे अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप केला. त्यांच्या आरोपानंतर आता खा. शरद पवार (Sharad Pawar) गटाचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यावेळी शरद पवार हे निर्णय घेत नव्हते. जिल्ह्यातील नेते निर्णय घेत होते. मी त्या गोष्टींचा साक्षीदार आहे. तसेच अभयसिंहराजेंमुळेच मला संधी मिळाली. मी त्यांच्याबरोबर असायचो. त्यांनी मुख्यमंत्री व्हावे एवढे त्यांच्याकडे गुण होते. विलासराव देशमुख यांनी अभयसिंहराजे भोसले यांना राष्ट्रवादीतून फोडण्याचा प्रयत्न केला होता. कारण, अभयसिंहराजे हे लोकप्रिय नेते होते. त्यामुळे पवार यांनी अन्याय केला नाही. तर त्यावेळच्या परिस्थितीनुसार निर्णय झाले. त्यामध्ये पवार यांनी कधीही हस्तक्षेप केला नाही, असे आमदार शिंदे यांनी म्हंटले.

सातारा येथील राष्ट्रवादी भवनमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विस्तारित जिल्हा कार्यकारिणीची आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील माने, प्रभाकर देशमुख, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, अर्चना देशमुख आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मत विचारात घेण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. यातून सर्वांनाच सतर्क करायचे होते. राज्यात आता महायुतीचे सरकार स्थापन झाले असून सातारा जिल्ह्यातील चारजण कॅबिनेट मंत्री झालेत. दोन उपमुख्यमंत्रीही सातारा जिल्ह्यातील असल्यासारखेच आहेत. या सर्वांकडून जिल्ह्यातील लोकांच्या अपेक्षा पूर्ण होतील. जिल्ह्याचा विकासाचा बॅकलाॅग भरून निघेल, अशी आशा आहे. निवडणुकीनंतर राज्यात सरकार आले असलेतरी लोकांत अजून विश्वास दिसत नाही. कारण, बीड आणि परभणीसारख्या घटना घडल्या आहेत.

राज्यात अशांततेचे वातावरण होऊ नये, अशी अपेक्षा आहे. त्यातच लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार होते. तो लाभ पूर्वी ज्या महिलांना मिळाला तेवढ्यांनाच द्यायला हवा. दूध दराचा प्रश्न आहे. तसेच कांदा दर, ऊसदर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना सलग आठ तास वीज मिळावी. शेतीपंपांना सोलर वीजची सक्ती करण्यात येऊ नये, अशीही आमची भूमिका आहे. यासाठी २७ डिसेंबरला साताऱ्यात दुचाकी रॅली काढून वीज कंपनी, वन विभागात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहे. तसेच हे प्रश्न न सुटल्यास जानेवारी महिन्यात मोर्चा काढण्यात येणार आहे. यातून पक्ष मजबूत करण्यात येणार येईल. तसेच पुढील काळात कार्यकर्त्यांवरही अन्याय होऊ देणार नसल्याचा इशारा आमदार शिंदे यांनी यावेळी दिला.