सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीचा निकाल काल लागला. अत्यंत अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा महायुती भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी पराभव केला. पराभवानंतर आता शिंदे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी त्यांच्या फेसबुक अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली असून त्यात “विझलो आज जरी मी, हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने, हे सामर्थ्य नाशवंत नाही!,” असे म्हटले आहे.
शशिकांत शिंदे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हंटले आहे की, सातारा लोकसभा निवडणुकीत झालेला निसटता पराभव मी खिलाडूवृत्तीने स्वीकारतो. शरदचंद्रजी पवार साहेबांचा शिलेदार म्हणून ही निवडणूक लढायला मी तयार झालो. झालेल्या पराभवाचे नक्कीच आत्मपरीक्षण करू. अनेक वेळा जय-पराजयाचे प्रसंग येत असतात.
सातारा जिल्ह्यातील तमाम जनतेचे मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. गेले अनेक दिवस महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते जीवाचे रान करत प्रचार करत होते. यापुढील काळात देखील माझ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या आणि समस्त सातारच्या जनतेच्या मी ऋणात राहील!, असे शिंदे यांनी म्हंटले आहे.