सातारा प्रतिनिधी । तब्बल सात वर्षांपासून शरद पवार गटाच्या प्रदेशध्यक्षपदाची धुरा खंबीरपणे सांभाळणारे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी काल मंगळवारी अखेर आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर माजी मंत्री शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. प्रदेशाध्यक्ष पदावर निवड झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी पक्ष संघटनेला अधिक भक्कम करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याचबरोबर त्यांनी आपल्या अधिकृ फेसबुक अकाऊंटवरून “आम्ही चालवू हा पुढे वारसा…” अशी एक पोस्ट देखील केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची मंगळवारी मुंबईत राज्य कार्यकारणीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून घोषणा केली. प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिंदे यांनी कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला. मात्र, त्यांनी केलेली फेसबुक पोस्ट अधिक चर्चेची ठरली.
प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती स्वीकारल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी फेसबुक पोस्ट करत लिहले की, आम्ही चालवू हा पुढे वारसा… मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब, जयंतराव पाटील साहेब, खा.सुप्रियाताई सुळे तसेच पक्षातील सर्व वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे मनापासून आभार!
पुरोगामी विचारांचा वसा आणि वारसा घेऊन महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकरी बांधवांच्या हितासाठी लढणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष. या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी विश्वासाने दिली. त्यांच्या या विश्वासाला न्याय देत या नव्या जबाबदारीसाठी मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब, जयंतराव पाटील साहेब आणि पक्षातील वरिष्ठ पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते यांचे मी मनापासून आभार मानतो…
संघर्षाच्या काळात आम्हा सर्वांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून सर्व कार्यकर्त्यांना पक्षनिष्ठेचा वस्तुपाठ घालून दिला असे मावळते प्रदेशाध्यक्ष मा.जयंतराव पाटील साहेब यांनी गेली ७ वर्षे पक्षाची धुरा अत्यंत सक्षमपणे पेलली. त्यासाठी त्यांचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वात काम करत असताना आजपर्यंत दिलेल्या जबाबदारीला पूर्णपणे न्याय देण्याचा माझा प्रयत्न राहिला.
जावळी मतदारसंघापासून सुरू झालेला हा प्रवास आज प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत येऊन पोहोचला आहे. मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि आपण सर्वजण माझे नेते आहात, असे मानूनच मी काम करत राहील. नवी फळी उभी करून महाराष्ट्रात स्वाभिमानाने आणि निष्ठेने इतिहास घडवायचा आहे. पक्षाला पुन्हा एकदा नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी मी कटीबद्ध आहे. माझी निष्ठा ही शरदचंद्रजी पवार साहेबांच्या चरणाशी राहिल. आजवर निष्ठेने आणि स्वाभिमानाने समाजातील प्रत्येक घटका विषयी लढा देत आलो आहे. त्याचे फलित म्हणूनच आज पक्षश्रेष्ठींनी प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि ही जबाबदारी मी नम्रपणे स्वीकारतो, असे शिंदे यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहले आहे.