कोरेगावातील ‘त्या’ ऑडिओ क्लिपची चौकशी करा; शशिकांत शिंदेंची निवडणूक आयोगाकडे मागणी

0
222
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | ‘कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सध्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरील उमेदवारांच्या क्रमावरून चुकीचा संदेश देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप नेमकं कोण व्हायरल करत आहे, याचा शोध पोलिसांनी तसेच निवडणूक आयोगाने घ्यावा,’ अशी मागणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार शिंदे म्हणाले की, कोरेगाव विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर क्रमांक एकवर आ. महेश शिंदे हे उमेदवार आहेत, तर क्रमांक दोनवर आ. शशिकांत शिंदे हे उमेदवार आहेत. मात्र, या संदर्भात चुकीचा संदेश देणारी ऑडिओ क्लिप मतदारसंघात व्हायरल झाली असून त्यामध्ये एक नंबरला मत दिले की शशिकांत शिंदेंना जाईल, असे म्हटले आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात आपण तक्रार केली असल्याचे शिंदे यांनी म्हटले.

यावेळी शशिकांत शिंदे यांनी मतदारसंघात विरोधकांकडून सुरू असलेल्या दबावतंत्राची माहिती दिली. पोलिस यंत्रणा पूर्णपणे दबावाखाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे तक्रार करूनही ते लक्ष देत नाहीत. कोणत्या हॉटेलवर कुठले गुंड उतरले आहेत, कोण ऑडिओ क्लिप वायरल करत आहे, याबाबत पोलिसांनी माहिती घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, पोलिस यंत्रणा त्याकडे लक्ष देत नसल्याची खंत आमदार शिंदे यांनी व्यक्त केली. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात तक्रार आजच दाखल केला आहे. एकंदरीत विरोधकांना निवडणूक अवघड वाटू लागली आहे. कारण सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. सामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.