सातारा प्रतिनिधी | नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अनेक घडामोडी घडत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार शशिकांत शिंदे यांनी काल अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नागपूरमध्ये भेट घेतली. तसेच अनेक विषयावर चर्चा देखील केल्याने दोघाच्या भेटीबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या दोन दिवसांपासून कोणालाही भेटले नसल्याने पार्श्वभूमीवर ते काल अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी झाले. तत्पूर्वी सकाळपासूनच त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी नेते, मंत्री दाखल झाले होते. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व आमदार शशिकांत शिंदे हे देखील सकाळीच अजित पवार यांच्या विजयगड या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. काहितास पवारांशी चर्चा केल्यानंतर ते तेथून बाहेर पडले. मात्र, आमच्यात कोणत्याही राजकीय प्रकाराबद्दल चर्चा न झाल्याचे शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
विधानसभेची निवडणूक नुकतीच झाली आहे. आमदार शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघातून ही निवडणूक लढवली आहे. त्यात अपयश आल्यानंतर त्यांनी ल्हासुर्णे येथील निवासस्थानी मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला होता. यावेळी काही कार्यकर्त्यांनी राजकीय भवितव्यासाठी सूचना देखील मांडल्या होत्या. मात्र, आमदार शिंदे यांनी सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर ‘वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत राहू,’ असेही आमदार शिंदे यांनी कार्यकर्त्यांपुढे स्पष्ट केले होते.या पार्श्वभूमीवर आज आमदार शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने चर्चेला उधाण आले.