सातारा लोकसभेचे ‘राष्ट्रवादी’चे उमेदवार शशिकांत शिंदे आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सातारा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार माजी मंत्री शशिकांत शिंदेयांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरउमेदवारास आपली संपत्ती देखील सांगावी लागते. दरम्यान, शिंदेंनी निवडणूक आयोगास दिलेल्या नामनिर्देशन पत्रातील नोंदींनुसार शिंदे हे कोट्यधीश असून, त्यांच्यासह पत्नीकडे ५० कोटींहून अधिक रक्कमेची स्थावर आणि जंगम मालमत्ता आहे. याशिवाय महागड्या गाड्या आणि शेतजमीनही नावे आहे तर दोघांच्याही नावे सुमारे १५ कोटींचे कर्ज आहे.

सातारा लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हींकडून त्यांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या गटाकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दि. १५ एप्रिल रोजी शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शपथपत्र देण्यात आले. त्यामध्ये संपत्तीचा तसेच इतर उल्लेख करण्यात आलेला आहे. शिंदे यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे.

त्यांच्याविरोधातील दोन फाैजदारी खटले प्रलंबित आहेत तर त्यांच्याकडे २५ हजार २५० रुपयांची रोख रक्कम हाती आहे तर पत्नी वैशाली शिंदे यांच्याकडे २० हजारांची रोकड आहे. शिंदे यांच्यासह त्यांच्या पत्नीकडील जंगम मालमत्तेची किंमत १६ कोटी ३८ लाख ३४ हजार ५४८ रुपये इतकी आहे. त्यांची स्थावर मालमत्ता दोघांच्याही नावे ३६ कोटी ९२ लाख ३५ हजार २६० रुपयांची आहे. शिंदे यांच्यावर ८ कोटी ४९ लाख रुपयांचे कर्ज आहे. तसेच पत्नीच्या नावेही ७ कोटी ४८ लाख रुपयांचे कर्ज आहे, असे शपथपत्रात स्पष्ट केलेले आहे.