सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर महायुतीतील भाजप नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले. त्यांच्या आरोपांना शिंदेनी प्रत्युत्तर देखील दिले. आता प्रत्यक मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी एक गंभीर आरोप करत थेट तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. “लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभवाच्या भीतीने किंवा विरोधात मतदान केले म्हणून प्रशासनाला हाताशी धरून कोरेगाव मतदारसंघातील आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल केले जात आहे. प्रशासनाला हाताशी धरून हा रडीचा डाव सुरू केला आहे. अशा दडपशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा आ. शिंदे यांनी दिला आहे.
आ. शशिकांत शिंदे यांनी नुकतेच एक पत्रक प्रसिद्ध केले असून त्यामध्ये म्हटले आहे की, पोलिस विभागाला बरोबर घेऊन काही जणांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी सुरू केला आहे. त्यात कोरेगाव, पिंपोडे येथील केसेसचा समावेश आहे. मुद्दाम तक्रार करायला लावून आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिसांवर दबाव टाकून असे प्रकार सर्रास कोरेगाव मतदारसंघातील कोरेगाव व पुसेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरू झाले आहेत. त्यावरून अधिकारी, कर्मचाऱ्यांना आचारसंहितेची भीती राहिली आहे की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे. पोलिस आणि प्रशासन पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या अधीन राहून काम करत असून, हे सर्व चुकीचे आहे. सत्तेच्या दबावाखाली किती राहायचे, सत्ता येते आणि जाते. परत आमची सत्ता आल्यानंतर काय करणार? असा प्रश्न आ. शिंदे यांनी उपस्थित केला आहे.