कोरेगाव मतदारसंघातील निवडणूक ही लोकशाही विरोधात हुकुमशाही अशीच होईल; शशिकांत शिंदेंचा इशारा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | कोरेगाव विधानसभा मतदारसंघात मतदार यादी अद्ययावत प्रक्रिया सुरू असून विरोधकांकडून नावे रद्द करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. लोकशाहीचा हा सरळ-सरळ खूनच आहे. यामध्ये अधिकारीही दबावाखाली काम करतात. त्यामुळे प्रांत कार्यालयात जाऊन जाब विचारणार आहे. त्याचबरोबर कोरेगाव मतदारसंघातील निवडणूक ही लोकशाही विरोधात हुकुमशाही अशीच होईल, असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला.

सातारा येथील राष्ट्रवादी भवनामध्ये गुरूवारी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आ. शिंदे म्हणाले, सध्या विधानसभा निवडणुकीमुळे मतदार यादी अद्ययावत प्रक्रिया सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातही प्रक्रिया पार पडत आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दुर्दैवाने विरोधी मतदारांची नावे रद्द करण्याचा प्रयत्न सुरू आहे. १६ आॅगस्टपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून दररोज दीड ते दोन हजार हरकती येत आहेत. २० हजारांपर्यंत या हरकती जातील. याबाबत प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा झाली आहे. कोणी खोटी हरकत घेतली असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. कारण, तशी तरतूद आहे. अधिकारीही दबावाखाली काम करतायत. यासाठी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

शुक्रवारी प्रांत कार्यालयात जाऊन जाब विचारणार आहे. लेखी उत्तर मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. कोरेगाव मतदारसंघात विरोधकांकडून षडयंत्र सुरू आहे, गेल्या महिन्यापासून हे नियोजनपूर्वक सुरू झाले आहे. ज्यांची मते मिळणार नाहीत, त्यांच्याबाबतच हे होत आहे. त्याला शासकीय यंत्रणा मदत करत आहे. याबाबत न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात येईल, असेही आमदार शिंदे यांनी यावेळी सांगितले.