सातारा प्रतिनिधी । विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतून उमेदवारांसह इच्छुकांकडून अर्ज भरण्यात आले आहेत. दरम्यान, सोमवारपर्यंत 97 उमेदवारांनी निवडणुकीत उडी घेतली आहे. सोमवारी 58 उमेदवारांनी 78 उमेदवारी अर्ज दाखल केले. विविध मतदारसंघांमध्ये मातब्बरांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. मात्र, यामध्ये सर्वाधिक चर्चा झाली ती कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शशिकांत धर्माजी शिंदे या अपक्ष उमेदवाराने भरलेल्या अर्जाची होय. या उमेदवाराने अर्जासोबत अनामत रकमेपोटी द्यावयाची 10 हजार रुपयांची रक्कम चिल्लर अधिकार्यांकडे सोपवली. त्यांनी पिशव्यांमध्ये नाणी भरून आणलेली होती. ही चिल्लर मोजता मोजता कर्मचार्यांच्या नाकी नऊ आले.
विधानसभा निवडणुकीसाठी दि. 22 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. दि. 29 ऑक्टोबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांनी पहिल्या दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेतले. मात्र, बहुतांश दिग्गजांनी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुहूर्ताचा शोध घेतला. वसुबारसेचा मुहूर्त साधत अर्ज भरण्याची तयारी अनेक दिग्गजांनी केलेली होती.तर धनत्रयोदशीचा मुहूर्तही काहींनी राखून ठेवलेला होता.
महायुतीने आठही मतदार संघातील उमेदवारांची नावे जाहीर करुन आघाडी घेतली होती. यापैकी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा-जावलीतून, ना. शंभूराज देसाई यांनी पाटणमधून, ना. महेश शिंदे यांनी कोरेगावातून, आ. जयकुमार गोरे यांनी माणमधून, मनोज घोरपडे यांनी कराड उत्तरमधून तर सचिन कांबळे-पाटील यांनी फलटणमधून उमेदवारी अर्ज दाखल केले. महाविकास आघाडीच्या पहिल्या यादीत नाव जाहीर झालेले कराड दक्षिणमधून आ. पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तरमधून आ.बाळासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
पाटणमधून शिवसेना उध्दव ठाकरे पक्षाची उमेदवारी मिळालेले हर्षद कदम यांनी तसेच महाविकास आघाडीतून डावललेले सत्यजित पाटणकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करताना सोमवारी सर्वच उमेदवारांनी मोठे शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान, माणमधून अनिल देसाई हे मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र, शरद पवार गटातून प्रभाकर घार्गे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे देसाई यांनी उमेदवार अर्ज न भरता घार्गे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला.