सातारा अप्रतिनिधी । देशभरातील लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता सर्वांना निकालाची प्रतीक्षा आहे. दि. 4 जून रोजी निकालाचे चित्र स्पष्ट होईल. त्यातच अनेक राजकीय नेते विजयाचे दावे करताना दिसत आहेत. असाच दावा शरदचंद्र पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केला आहे. “देशात झालेल्या लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी जनतेने निवडणूक हाती घेतली होती. सत्ताधाऱ्यांविषयी प्रचंड नाराजीचे वातावरण असून महाराष्ट्रात महाविकास आघाडी 30 ते 35 जागा जिंकेल आणि केंद्रात इंडिया आघाडी सत्तेत येईल, असा विश्वास आ. शिंदे यांनी साताऱ्यात व्यक्त केला आहे.
आमदार शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी दि. 4 जूनला होणाऱ्या लोकसभेच्या निकालावर प्रतिक्रिया दिली. सातारा लोकसभेबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, सातारा लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीच्या उमेदवाराबाबत लोकांच्या मनात प्रचंड नाराजी असल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पहायला मिळाला. लोकांची उमेदवाराबरोबरच भाजप पक्षाविषयीही नाराजी असल्यामुळे याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निश्चित होणार आहे.
यावेळी जनतेने स्वत:च्या हातात ही निवडणूक घेतली होती. त्यामुळे लोकसभेच्या पहिल्या दोन टप्प्यातील मतदानानंतर भाजपच्या लक्षात आले की आपल्या हातून जागा जात आहेत. त्यामुळे त्यांनी आपली स्ट्रॅटेजी बदलली आहे. सध्यातरी भाजपचे केंद्रात आपले सरकार येईल, असे वाटत नाही, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.