सातारा प्रतिनिधी । पुणे येथील कल्याणीनगरमध्ये अपघातानंतर तेथील ससून हॉस्पिटलमधील घडलेल्या प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनीसरकारवर निशाणा साधला आहे. “ससून रुग्णालयात सक्तीच्या रजेवर असलेले डॉक्टर ट्रीटमेंट करतात, रक्ताचे नमुने तपासतो, याबाबतची चौकशी समितीची नेमणूक हा केवळ फार्स असून यापूर्वी घडलेले ललित पाटील प्रकरण आणि आत्ताच्या अग्रवाल प्रकरणात फार मोठी डील झालेली आहे. या सरकारमधील एका प्रमुख मंत्र्यांचा हात आहे. डॉ. तावरे याला पुन्हा पदावर बसविण्यासाठी सातारा जिल्ह्यातील एका आमदारने शिफारस केली होती, असा गौप्यस्फोट आ. शशिकांत शिंदे यांनी शुक्रवारी केला.
आमदार शशिकांत शिंदे यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिंदे म्हणाले, पुणे येथील ससूनमध्ये गेली काही दिवस जे काही घडत आहे, त्याला सरकारच जबाबदार आहे. या घटनेत सरकारचे दुर्लक्ष झाल्यामुळेच हे घडले आहे. ससूनमध्ये किडनी रॅकेटबाबत ज्या अधिकाऱ्यांची नावे आली होती, तेच अधिकार येथे पुन्हा आणले गेले आहेत. त्यासाठी कोणाची शिफारस होती. याची निवृत्त न्यायमूर्तीच्या माध्यमातून चौकशी झाली.
त्याचा अहवाल येण्याआधीच रुबी हॉस्पिटलला परवाना परत केला आहे. हा परवाना नूतनीकरण कोणाच्या सांगण्यावरुन केला. यामध्ये कोणत्या मंत्र्यांचा हात होता? हे समोर आले पाहिजे. डॉ. तावरे यांना कोणत्या मंत्र्यांने पुन्हा आणले? त्यासाठी सातारा जिल्ह्यातील कोणत्या आमदाराने शिफारस केली?, हे उघड होणे गरजेचे आहे. याची चौकशी करावी, यासाठी आम्ही सीबीआय(CBI) चौकशीची मागणी केली आहे. रुबी हाॅस्पिटलचा परवाना कोणी नुतनीकरण केला?, तसेच भ्रष्ट अधिकाऱ्यांना पुन्हा परत का बसविले?, याची जबाबदारी घेऊन सरकारमधील प्रमुख मंत्र्याने राजीनामा द्यावा, अशी प्रमुख मागणी यावेळी शिंदे यांनी केली.