सातारा प्रतिनिधी | सातारा जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अनेक पक्षांच्या नेत्यांच्या बैठका देखील घेण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आमदार शशिकांत शिंदे यांनी आज साताऱ्यात राष्ट्रवादी भवनात पत्रकार परिषद घेत कोरेगाव मतदारसंघातून मी लढणार असल्याची घोषणा केली. ‘काहीही असू देत मी कोरेगाव मतदारसंघातूनच लढणार आहे. त्यामुळे विरोधकांनी त्याची काळजी करू नये, असे, विधान शिंदे यांनी यावेळी केले.
साताऱ्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत आमदार शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव मतदारसंघात सध्या सुरू असलेल्या मतदार नोंदणी कार्यक्रमावर आक्षेप घेतला. यावेळी ते म्हणाले की, कोरेगाव मतदारसंघात लोकशाहीविरोधात ठोकशाही अशी लढत असेल.
कराड दक्षिण व उत्तरमध्ये विरोधकांनी मते विकत घेतली होती. त्यामुळे माझा हा तांत्रिक पराभव आहे. आता यावेळेस लोकांनी ही निवडणूक हाती घेतली असून, यावेळेस इतिहास घडेल, असा विश्वास यावेळी आमदार शिंदे यांनी व्यक्त केला.