कोरेगावात महायुती अन् महाविकास आघाडीत थेट लढत!; दोन शिंदेंमध्ये कोण मारणार बाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोरेगाव विधानसभा मतदारसंघात यावेळी महायुती विरोधात महाविकास आघाडीमध्ये थेट लढत होणार आहे. विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्याविरोधात आमदार शशिकांत शिंदे यांच्यामध्ये ‘कांटे की टक्कर’ होणार आहे. नुकताच शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरत प्रचारास देखील सुरुवात केली आहे. मात्र, या मतदारसंघात सध्या निष्ठेबरोबरच मराठा क्रांतियोद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या पॅटर्नचीच जोरदार चर्चा आहे.

२००९ मध्ये विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी दहा वर्षे या मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रतिनिधित्व केले. पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांचे एकनिष्ठ शिलेदार असलेल्या शशिकांत शिंदे यांनी जलसंपदा मंत्रिपद देखील भूषविले आहे. त्यांनी २०१९ पासून सुरू असलेली पराभवाची मालिका खंडित करण्याचा ठाम निश्चय केला आहे. लोकसभा निवडणुकीपासून त्यांनी आपल्या कामकाजामध्ये आमूलाग्र बदल केला असून, कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचा पण केला आहे. त्यादृष्टीने त्यांची आपली वाटचाल सुरू आहे.

तर दुसरीकडे महायुतीचे आमदार महेश शिंदे यांनी २०१९ मध्ये पहिल्यांदा आमदारपदाला गवसणी घातल्यानंतर २०२४ च्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. महायुतीतील घटक पक्ष आणि नेतेमंडळींशी जवळीक असलेल्या महेश शिंदे यांच्याकडे कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या पाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांनी या पदाच्या माध्यमातून पाणीप्रश्न सोडवत विधानसभा निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली आहे.

कोरेगाव विधानसभा २०१९ ची निवडणूक

महेश शिंदे : 1 लाख 1 हजार 487
शशिकांत शिंदे : 95 हजार 255

कोरेगाव विधानसभा मतदार संघ मतदार संख्या

1) पुरुष : 1,61,720
२) महिला : 1,57,068
३) तृतीयपंथी : 02
४) एकूण मतदार : 3 लाख 18 हजार 791