हजारो भाविकांच्या उपस्थितीत मांढरगडावर शारदीय नवरात्र उत्सवाची सांगता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । महाराष्ट्राचे तसेच महाराष्ट्रबाहेरील लाखो भक्तांचे आराध्य दैवत असलेल्या आई काळुबाई देवीचा नवरात्र उत्सव मागील काही दिवसांपासून सुरू होता. त्या उत्सवाची सांगता शुक्रवारी हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाली.

मांढरदेव गावातील सर्व ग्रामस्थ पुरुष, महिला, बालके गावचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ मंदिरातील येऊन देवाची पूजा आरती करून घट उठवण्याची परंपरा मागील अनेक पिढ्यांपासून सुरू आहे. शुक्रवारी ग्रामस्थ,महिला, पुरुष व पुजारी काळुबाई देवीच्या मंदिरात जमा झाले. शास्त्रशुद्ध पद्धतीने मंत्र उपोचार केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. देवीला नैवेद्य दाखवून देवीचा घट उठवण्यात आला.

आई काळुबाई देवीची घटस्थापना गुरुवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी झाली होती. मागील नऊ दिवसापासून महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राच्या बाहेरून लाखो भाविकांनी काळुबाई देवीचे दर्शन घेण्याचा लाभ घेतला. त्यामध्ये भाविकांना दर्शन सुलभ घेता यावे यासाठी देवस्थान ट्रस्ट मार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले होते. भाविकांचा जास्त वेळ वाया न जाता देवी दर्शन पटकन घेता यावे म्हणून देवस्थान ट्रस्टमार्फत तत्काळ दर्शन सुविधा देखील सुरू करण्यात आलेली आहे. त्यास भाविकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. देवस्थान ट्रस्टमार्फत येणाऱ्या भाविकांसाठी मोफत खिचडी व राजगिरा लाडूचे, चिक्कीचे वाटप करण्यात आले.

भाविकांच्या मनोरंजनासाठी तसेच मंदिर परिसरातील वातावरण भक्तीमय राहावे यासाठी देवीची गाणी, भजन सांस्कृतिक कार्यक्रम याचे देखील आयोजन करण्यात आले होते. पोलीस,होमगार्ड आणि सुरक्षा रक्षक यांच्यामार्फत मंदिर परिसरामध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे नवरात्र उत्सव काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार न घडता भाविकांना देवीचे दर्शन घेता आले.त्यामुळे भाविकांकडून देवस्थान ट्रस्टच्या तसेच पोलीस प्रशासन यांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करण्यात आले.