स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील; साताऱ्यात 20 व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन प्रसंगी शरद पवारांचे महत्वाचे विधान

0
4

सातारा प्रतिनिधी | साताऱ्यात जागतिक मराठी अकादमी आणि रयत शिक्षण संस्था सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या ‘शोध मराठी मनाचा’ या 20 व्या जागतिक मराठी संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. यावेळी नवे विचार, माहिती, अनुभव यांचे अदान प्रदान व्हावे हा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून जागतिक मराठी अकादमीच्या माध्यमातून जागतिक मराठी संमेलन आयोजित केले जाते. यावर्षी हे संमेलन सातार्‍यात होत आहे. सातारा ही पराक्रम गाजवणार्‍यांची भूमी आहे. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आता शिवछत्रपतींची दृष्टी घेऊन स्वराज्याचे सुराज्य करण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील, असे आवाहन जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केले.

संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत आ. ह. साळुंखे होते, याप्रसंगी उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, जागतिक मराठी अकादमीचे उपाध्यक्ष कवी रामदास फुटाणे, खा. रामशेठ ठाकूर, माजी खासदार श्रीनिवास पाटील, यशवंतराव गडाख, माजी मंत्री उल्हासदादा पवार, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, ज्येष्ठ विचारवंत दत्तप्रसाद दाभोलकर, कर्मवीर विद्यापीठाचे कुलगुरु ज्ञानदेव म्हस्के, अभिनेते सयाजी शिंदे, रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, सचिव विकास देशमुख, संघटक डॉ. अनिल पाटील, रयतचे व्हा. चेअरमन भगिरथ शिंदे, ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, उद्योजक हणमंतराव गायकवाड यांची उपस्थिती होती.

खा. पवार म्हणाले, 1989 मध्ये आम्ही जागतिक मराठी परिषदेची स्थापना केली. पहिले अधिवेशन मुंबईत झाले. या संमंलनाला कवी कुसुमाग्रज, गायिका लता मंगेशकर यांची उपस्थिती होती. तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांनी अस्खलित मराठी भाषेमध्ये भाषण केले होते. सातारा ही पराक्रम गाजविणार्‍यांची भूमी आहे. अनेक चळवळी येथे झाल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध याच जावलीच्या खोर्‍यात केला. क्रांतीसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, किसन वीर या स्वातंत्र्यवीरांचा जन्म याच भूमीत झाला.

उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत म्हणाले, मी ज्या शाळेत शिकलो, त्या मराठा मंदिर या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शरद पवार होते. तसेच माझ्या राजकीय कारकीर्दीचे कुलगुरुदेखील शरद पवारच होते. मराठी भाषेचा पहिला राज्यमंत्री शरद पवार यांनीच मला बनवले होते. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझ्यावर मराठी भाषा विभागााची जबाबदारी दिली आहे. ही जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडत आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तास्थापनेनंतर पहिल्याच अधिवेशनात महाराष्ट्र जोडण्याची घोषणा केली होती. सर्व पक्षांच्या नेत्यांशी, वेगवेगळ्या विचारधारेच्या लोकांशी प्रामाणिकपणे संवाद व समन्वय ठेवण्याची घोषणा केली होती. मात्र, एक जण रोज सकाळी 9 वाजता शब्ददारिद्य्र घेऊन सर्वांसमोर येतोय. त्याला आवरायला हवे, अशी टीका ना. आशिष शेलार यांनी केली, तसेच शरद पवार साहेबांनी सर्व क्षेत्रात सर्वांगाने काम केले असल्याने ते नक्कीच शब्दप्रभूंच्या पाठिशी राहतील, अशी आम्हाला आशा आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर उद्योजक हणमंतराव गायकवाड यांना जागतिक मराठी भूषण पुरस्कार व ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर यांना जागतिक मराठी गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.