सातारा प्रतिनिधी | माण-खटाव विधानसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला सुटला आहे. या मतदारसंघामध्ये शरद पवार गटाच्या इच्छुकांची संख्या मोठी आहे. या मतदारसंघातून उमेदवार देण्यासाठी रविवारी खा. शरद पवार यांनी मुंबईत इच्छुकांशी खलबते करत त्यांची मते जाणून घेतली. दरम्यान, लवकर निर्णय होणार असून जयकुमार गोरेंविरोधात कोण याकडे लक्ष लागून राहिले आहे.
बैठकीत इच्छुकांशी संवाद साधल्यानंतर पवारांनी उमेदवाराच्या नावाचा प्रस्ताव पार्लमेंटरी बोर्डापुढे ठेवण्यात येईल. पार्लमेंटरी बोर्ड जो उमेदवार देईल त्याला निवडून आणण्याच्या सूचना केल्या. माण विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची भाऊ गर्दी झाली आहे. येथून शरद पवार गटातूनच अनेक जण इच्छुक आहेत. निवडणुकीपूर्वी पक्षातील बंडखोरी रोखण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे इच्छुकांना बोलावले होते.
या बैठकीस माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ. शशिकांत शिंदे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई, अभयसिंह जगताप, जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुभाष नरळे, संदीप मांडवे, सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, मकरंद बोडके, बाळासाहेब सावंत, मनोज पोळ, बबन वीरकर, नितीन देशमुख, सुर्यकांत राऊत, दिलीप तुपे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
खा. शरद पवारांनी सर्वांशी एकत्रित संवाद – साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी कुणी उघडपणे आपले मत व्यक्त केले नाही. त्यामुळे शरद पवारांनी वैयक्तिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनिल देसाई, प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, बबन वीरकर, नितीन देशमुख, सुर्यकांत राऊत या प्रत्येकांना एका दालनात एकएकटे बोलावून घेतले.
कुणाची काय मते आहेत ही जाणून घेतली. त्यानंतर खा. पवार यांनी माण खटावमधून जो उमेदवार पार्लमेंटरी बोर्डामार्फत दिला जाईल, त्याचे सर्वांनी एकनिष्ठेने काम करायचे आहे. माण खटावची जागा निवडून आणायची आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने कामाला लागा, अशा सूचना केल्या.