यशवंतरावांनी सुद्धा पार्लमेंट चुकवली नव्हती अन् 15 दिवसात पंतप्रधान मोदी फक्त 1 तासच संसदेत आले – शरद पवारांचा हल्लाबोल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | पंधरा दिवसांचे सेशन झाले. त्यामध्ये प्रधानमंत्री एक तासासाठी पार्लमेंटमध्ये आले. पुन्हा ढुंकूनसुद्धा बघितले नाही, अशा शब्दांत खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण यांनी एक दिवस सुद्धा पार्लमेंट चुकवली नव्हती, याचाही दाखला त्यांनी दिला.

संसद हे लोकशाहीचे मंदिर

साताऱ्यातील कृषी प्रदर्शनात बोलताना खासदार शरद पवार म्हणाले, पार्लमेंट ही लोकशाहीमधील महत्वाची संस्था आहे. तिचा सन्मान केला पाहिजे व तिथे प्रश्न मांडायची संधी ही सगळ्यांना असली पाहिजे. पण, आज आम्ही बघतो की १५ दिवसांचे सेशन झाले. त्यामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक तासासाठी पार्लमेंटमध्ये आले. बाकी ढुंकूनसुद्धा बघितले नाही. जवाहरलाल नेहरू असोत, इंदिरा गांधी असोत, यशवंतराव चव्हाण असोत, त्यांनी एक दिवससुद्धा चुकवला नाही. संसद ही लोकशाहीचे मंदिर आहे. त्याचा सन्मान केला पाहिजे.

आपली वैचारिक भूमिका मजबूत

शरद पवार म्हणाले, माझे एकच सांगणे आहे की, कोणी गेले किंवा कोणी आणखी काही केले, तरी आपण विचार सोडायचा नाही. आपल्यात धमक आहे. कष्ट करण्याची तयारी आहे. वैचारिक भूमिका मजबूत असली तर कोणी काहीही करू शकत नाही. त्यामुळे वेगळी भूमिका घेणाऱ्यांना लोकशाहीमध्ये आपण त्यांची जागा दाखवू शकतो, असा विश्वास त्यांनी आपल्या समर्थकांना दिला.

पक्ष, चिन्हाची चिंता मला नाही

काही लोकांनी पक्ष नेला, चिन्ह नेलं. पण, मी त्याची कधी चिंता करत नाही, असं सांगून शरद पवार म्हणाले, विकासासाठी वेगळ्या मार्गाने जाण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे. पण, ती भूमिका सामान्य जनतेला पटणारी नाही. सत्ता येते आणि जाते. मात्र, विचार, धोरणे ही कायमची असतात. देशाला पुढे नेण्यासंबंधीचा कार्यक्रम आपल्याला राबवायचा आहे.

अटलबिहारी वाजपेयींचं दिलं उदाहरण

या देशात अटल बिहारी वाजपेयी हे भाजपचे नेते अनेक वर्ष विरोधी पक्षात होते. त्यांनीही देशाची सेवा केली. देशाच्या सेवेसाठी स्वतःचा विचार आणि पक्ष सोडून दुसरीकडे जाण्याची भावना कधी त्यांच्या मनात आली का? त्यांनी कधी विचार सोडला नाही. वैचारिकदृष्ट्या आमचे मतभेद असतील, पण विचार त्यांनी जतन केला, ही गोष्ट मान्य केली पाहिजे, असं उदाहरण देत शरद पवारांनी अजितदादांना टोला लगावला.

महाराष्ट्रात नवीन पिढीचे नेतृत्व तयार करू

अनेक लोक म्हणतात की वय झाले. म्हणून काय झालं? असा खोचक सवाल करून शरद पवार म्हणाले, वयाची चिंता करू नका. याही परिस्थितीत आपण मात करू शकतो. वयाच्या ८५ व्या वर्षी मोरारजी देसाई देशाचे पंतप्रधान झाले. मनःस्थिती आणि विचारधारा जर भक्कम असली तर वय कधी आडवं येत नाही. आपण आपल्या भूमिका घेऊन पुढे जाऊया. आपण नवीन पिढीचे नेतृत्व महाराष्ट्रामध्ये तयार करू. नवी पिढी महाराष्ट्र घडवू शकते, हा इतिहास निर्माण करू.