कराड प्रतिनिधी | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा काल निकाल लागला. सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडासाफ केला. या निकालानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार आपला पहिला दौरा करत असून ते आज कराड येथे मुक्कामी येत आहेत. या दौऱ्यावेळी ते निकालाबाबत नेमकं काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
सातारा जिल्ह्यात कोणत्याही परिस्थितीत आपला आमदार निवडून येणार अशा पावित्र्यात असलेल्या महाविकास आघाडीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. तर विद्यमान चार आमदारांना पराभवास सामोरे जावे लागले. त्यामध्ये कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, फलटणचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार दीपक चव्हाण, कोरेगावचे शशिकांत शिंदे आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांना पराभवास सामोरे जावे लागले.
सातारा जिल्ह्यात काल लागलेल्या धक्कादायक निकालानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे कराड दौऱ्यावर मुक्कामी येत आहे. सायंकाळी ते हेलिकॉप्टरने येथील विमानतळावर येतील. तेथून ते एका हॉटेलवर मुक्कामी थांबणार आहेत. तेथे जिल्ह्यातील विधानसभा निकालाचा आढावा घेण्याची शक्यता आहे.
उद्या सोमवारी (दि. 25) सकाळी आठ वाजता जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त ते त्यांच्या कृष्णा-कोयना नद्यांच्या प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी रवाना होतील. समाधीस अभिवादन करुन ते तेथील संगीत कार्यक्रमास भेट देवुन वेणुताई चव्हाण सभागृहाकडे रवाना होतील. तेथे यशवंतराव चव्हाण ट्रस्टच्या बैठकीस ते उपस्थित राहतील. तेथुन ते येथील विमानतळावरुन हेलीकॉप्टरने मुंबईकडे रवाना होणार आहेत.