साताऱ्यातील विधानसभा इच्छुकांच्या शरद पवार मंगळवारी घेणार मुलाखती; 8 विधानसभा मतदारसंघांतून 32 जणांनी केलीय तिकीटाची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतून तब्बल ३२ जणांनी पक्षाकडे तिकिटाची मागणी केली आहे. निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या • मंगळवार, दि. ८ ऑक्टोबररोजी पुण्यात खा. शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील मुलाखती घेणार आहेत.

गुलटेकडी मार्केट यार्ड, पुणे येथील निसर्ग मंगल कार्यालयात मंगळवारी दुपारी चार वाजता मुलाखती होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांमधून खा. शरद पवार यांच्या पक्षातर्फे लढण्यासाठी तब्बल ३२ जणांनी इच्छा व्यक्त केली आहे. ८ ऑक्टोबरपर्यंत इच्छुकांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.

फलटण विधानसभा मतदारसंघातून राजेंद्र पाटोळे, अभय वाघमारे, लक्ष्मण माने, अमोल आवळे, दिगंबर आगवणे, वैभव पवार, रमेश आढाव, बुवासाहेब हुंबरे, डॉ. राजेंद्र काकडे, प्रा. डॉ. बाळासाहेब कांबळे, प्रा. डॉ. अनिल जगताप, घनश्याम सरगर, बापूसाहेब जगताप, सूर्यकांत शिंदे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. वाईमधून दत्तात्रय सर्जेराव ढमाळ, अनिल जगताप, डॉ. नितीन सावंत, रमेश धायगुडे-पाटील, कैलास जमदाडे, यशराज भोसले, निलेश डेरे यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. कोरेगावमधून आ. शशिकांत शिंदे, माणमधून प्रभाकर देशमुख, माजी आमदार प्रभाकर घार्गे, अभयसिंह जगताप, अनिल देसाई यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील, कराड दक्षिणमधून सविनय कांबळे, पाटणमधून सत्यजित पाटणकर, सातारा जावलीतून दीपक पवार, अमित कदम, शफीक शेख आदींनी उमेदवारीची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडे केली आहे.

या मुलाखतींसाठी इच्छूक उमेदवारांनी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष सुनील माने व सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी केले आहे.