सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर खासदार शरद पवारांनी मध्यंतरी काही भागांचे दौरे केले. आता कालांतराने पुन्हा खा. शरद पवार शुक्रवारी, दि. २५ रोजी बारामती, फलटणमार्गे कोल्हापूरला जाणार आहेत. यावेळी दहिवडी येथे त्यांची जाहीर सभा आणि कार्यकर्ता संवाद मेळावा होणार आहे. शरद पवार जाहीर सभेत काय बोलणार? आणि संवाद मेळाव्यात कार्यकर्त्यांना कोणता मंत्र देणार? याबद्दल सातारा जिल्हावासियाना उत्सुकता लागून राहिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवारांनी कराडला प्रीतिसंगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी नतमस्तक होत महाराष्ट्र पिंजून काढण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्याच अनुषंगाने त्यांचे दौरे सुरू आहेत. या दौऱ्यांमध्ये भाजपसह अजित पवार गटावर त्यांनी सडेतोड टीका सुरू केली आहे. शुक्रवारी त्यांची दहिवडी (ता. माण) येथे जाहीर सभा आणि कार्यकर्ता संवाद मेळावा होत आहे.
शरद पवार यांचा सातारा जिल्हा दौरा कार्यकर्त्यांना ऊर्जादायी ठरणार आहे. कोल्हापूरला जाहीर सभेच्या निमित्ताने जाताना खासदार शरद पवार बारामतीवरून फलटणमार्गे दहिवडी येथे येणार आहेत. दहिवडीत त्यांच्या उपस्थितीत रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासह विविध कार्यक्रम होणार आहेत.
शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांचे दहिवडीत आगमन होणार आहे. सव्वा दहा ते अकरा या वेळेत दहिवडी कॉलेजमध्ये त्यांच्या हस्ते गरजू मुलींना पाचशे सायकलचे वाटप होईल. सव्वा अकरा ते पावणे बारापर्यंत दहिवडी नगरपंचायत इमारतीचे उद्घाटन आणि त्यानंतर दहिवडी येथील बाजार पटांगणावर कार्यकर्ता संवाद मेळावा तसेच जाहीर सभा होईल. दुपारी अडीच वाजता दहिवडी येथून वडूज, पुसेसावळी, कराडमार्गे ते कोल्हापूरला जाणार आहेत. कोल्हापूरच्या जाहीर सभेसाठी असंख्य कार्यकर्ते रॅलीने त्यांच्यासोबत जाणार आहेत.