शरद पवार आज अचानक सातारा दौऱ्यावर; नेमकं कारण काय?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले आहे. निवडणुकीची रणधुमाळी निर्णायक टप्प्यावर असूनही आणि त्यातही सातारचे मतदान पार पडल्याने विजयाचा गुलाल कुणावर पडणार? याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. अशात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे आज अचानक सातारा दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याकडे व त्यांच्याकडून सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत काय बोलले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ६५ व्या पुण्यतिथी कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या वतीने गुरुवारी सकाळी ८.३० वाजता येथील कर्मवीर समाधी परिसर येथे करण्यात आले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज पुण्यतिथी असून यानिमित्त आयोजित सोहळ्यास पवार उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा पार पडणार आहे.

या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाईस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, जनरल बॉडी सदस्य, आजीव सेवक, आजीव कार्यकर्ते, संस्थेचे पदाधिकारी इत्यादी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास सर्व शिक्षणप्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.