सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवराजे निंबाळकर आणि त्यांचे सुपुत्र अनिकेत निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांनी प्रवेश केला आहे. या कार्यक्रमातून शरद पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. “काही तरुण मुले हातात बोर्ड घेऊन उभे होते. त्यात माझा फोटो होता. त्यात लिहिले होते की, 84 वर्षांचा म्हातारा. तुम्ही काही काळजी करू नका. आपल्याला लांब जायचंय, 84 होवो की 90 होवो हा म्हातारा काही थांबत नाही. हे म्हातारं महाराष्ट्राला योग्य रस्त्यावर आणल्याशिवाय थांबत नाही, असे महत्वाचे विधान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे.
फलटण येथील पार पडलेल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil), खासदार अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. यावेळी शरद पवार म्हणाले की, “मागे आलो होते तेव्हा काहीतरी चुकतंय का असे कार्यकर्त्यांकडे बघून वाटत होतं. मी अनेक सभा घेतल्या मला डोळ्यात बघून कळतं. आज तुमचे डोळे प्रफुल्लित आहेत. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या सभेला आलो होतो तेव्हा डोळ्यात घबराट होती. माझ्या आईची श्रद्धा राजाळे येथील मंदिरात होती. आज पुन्हा एकदा महाराष्ट्र उभा करायचा आहे.
शरद पवार यांनी आपल्या भाषणा दरम्यान, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नसण्याबद्दल देखील विधान केले. यावेळी ते म्हणाले की, इथे एक जण दिसत नाहीये. परंतु त्यांची मानसिकता काय आहे हे धैर्यशील यांच्या निवडणुकीत मला कळालं. एक जण इतर दिसत नाही त्याची चिंता तुम्ही करू नका, असे पवार यांनी म्हटले.
देशात तुतारीचा आवाज आल्याशिवाय राहणार नाही
फलटण येथील भाषणादरम्यान शरद पवार यांनी केंद्रातील भाजप सरकारवर देखील निशाणा साधला. यावेळी पवार म्हणाले की, आज चुकीच्या हातात सत्ता आहे. आज महाराष्ट्रात अत्याचार होत आहेत. शाळेत लहान मुलीवर अत्याचार झाला. काल एका माजी मंत्र्यांची हत्या झाली. सामान्य माणूस आणि आया बहिणींना सुरक्षिततेने जगता येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले. आठ महिन्यात पुतळा कोसळला. साठ वर्ष होऊन गेली तरी यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते अनावरण झालेल्या पुतळ्याला काही झालं नाही.