सातारा प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आज सातारा जिल्हा दौऱ्यावर असून आज त्यांच्या उपस्थितीत वाई येथे सभा पार पाली. या सभेत पवारांनी महायुती सरकारच्या अनेक निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला. वाईत सभेत कार्यकर्त्यांसोबत संवाद साधत असताना त्यांच्याकडे एक चिठ्ठी आली आणि गद्दारांचं काय? अशी विचारणा झाली. ती चिठ्ठी दाखवत शरद पवार यांनी ‘आता गद्दारांना पाडा, पाडा पाडा…” असे म्हंटले.
वाई, महाबळेश्वर, खंडाळा विधानसभा मतदार संघात शरद पवार गटाच्या उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांच्या प्रचारार्थ नुकतीच सभा पार पडली. यावेळी शरद पवार यांनी उपस्थित राहत वाईमध्ये सभा घेत पिसाळ यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. यावेळी पवार पुढे म्हणाले की, “आज महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांच्याकडून प्रश्न सुटत नाहीत. महाराष्ट्राच्या जनतेचे मला आभार मानायचे आहेत.
लोकसभेचा निकाल पाहिल्यानंतर भाजपच्या लक्षात आले आणि मग त्यांनी काही निर्णय घेतले. लाडकी बहीण त्याचाच भाग. आमच्या मनात हीच शंका आहे की मध्यप्रदेश प्रमाणे हा सुद्धा निर्णय मागे पडेल. स्रियांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. राज्यातून अनेक मुली गायब होत आहेत, बेपत्ता होत आहेत. लाडक्या बहिणीची प्रतिष्ठा तुम्ही अशी ठेवता? महिलांच्या सन्मानाबाबत आम्ही कधीही तडजोड केली नाही.”
लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीत शरद पवार वाईमध्ये गेले होते. आमदार मकरंद पाटील यांच्या कुटुंबातील लग्नासाठी ते उपस्थित राहिले होते. त्यावर बोलताना पवार म्हणाले की, “मी मकरंद पाटील यांच्या घरातील लग्नात गेलो. सगळे नेते त्या ठिकाणी उपस्थित होते. मी उशीरा आलो. त्यावेळी मोठमोठ्या टाळ्या आणि घोषणा होत होत्या. त्याचवेळी मला वाईतील लोकांची भावना समजली होती. आताच्या सभेला जागा बसायला जागा नाही. लोक म्हणतात आमचं ठरलंय.”, असे पवार यांनी यावेळी म्हटले.