कराड प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळाचे सर्व अधिकार नेते म्हणून पहिल्यापासून जयंत पाटील यांच्याकडे आहेत. जयंत पाटील हे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. अपात्र करायचा की नाही हा अधिकार जयंत पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा आहे. अजित पवार म्हणजे पक्ष नाही. आम्ही राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार आहोत. आम्ही अजित पवारांसह इतरांना अपात्र करण्याच्या भानगडीत पडणार नाही किव्हा त्यांच्यावर कुठली कारवाई करणार नाही. आम्ही जनतेत जाणार आहोत. त्यासाठी आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी गुरु यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सुरुवात केली आहे. साताऱ्यातून चुकीच्या गोष्टींना विरोध केला जतो असे म्हणतात त्याची सुरुवात येथूनच करतोय, असे पवार यांनी म्हंटले.
कालच्या राजकीय भूकंपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी राजकीय गुरु स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करत एल्गार पुकारला. यानंतर त्यांनी साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधत पुतण्या उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, काही लोकांनी महाविकास आघाडी सरकार उलथून टाकण्याचे काम केले. केवळ महाराष्ट्रात नाही तर देशात इतर ठिकाणीही असे करण्यात आले.
चुकीच्या प्रवृत्ती डोकं वर काढत आहेत. त्याच प्रवृत्तींनी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, चव्हाणसाहेब यांच्या महाराष्ट्रात लोकशाही पद्धतीने काम करणाऱ्या राजकीय पक्षाला एक प्रकारचा धक्का देण्याचा प्रयत्न केला आहे. आज महाराष्ट्रात आणि देशात जाती-धर्मात, माणसा-माणसांत संघर्ष कसा होईल याची काळजी घेणारा एक वर्ग आहे. महाराष्ट्र हा बंधुत्व, इमान राखणाऱ्यांचा सन्मान करणारे राज्य असल्याचे पवार यांनी म्हंटले.
मोदींनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला ते त्यांच्याच पक्षातील मंत्रिमंडळात
गेल्या काही दिवसापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे सहकारी भ्रष्टाचारात सहभागी झालेत असं म्हणाले. राज्य सहकारी बँक, सिंचन विभागातील गोष्टींचा त्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला. आज त्यांनी ज्यांच्यावर आरोप केले ते त्यांच्याच मंत्रिमंडळात सहभागी झाले. म्हणजे पंतप्रधानांचे आरोप वास्तव्य नव्हते. ही राष्ट्रवादीसाठी जमेची बाजू आहे. त्याचा मला आनंद आहे असे पवार यांनी यावेळी म्हंटले.
जयंत पाटलांचे काम कायद्यानुसार
बंडखोरी केलेल्या आमदारांबाबत जयंत पाटील यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की, जयंत पाटलांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा अधिकार आहे. तो निर्णय त्यांनी विचारपूर्वक घेतला असेल. जयंत पाटील हे खूपच शिस्तबद्ध आहेत आणि ते कायद्यानुसारच काम करतात. 1988 मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तीन-चार जण सोडले तर बाकी सगळे पराभूत झाले होते, अशी आठवणही शरद पवार यांनी सांगितली.
सातारा, कोल्हापूरने बळ दिले
महाराष्ट्रात सातारा आणि कोल्हापूरने राष्ट्रवादीला बळ दिल्याचा आवर्जून उल्लेख शरद पवार यांनी केला. ज्यांच्याविरोधात आमचा संघर्ष आहे, त्यांच्यासोबतच आमचे सहकारी गेले, परंतु नव्या पीढिला आम्ही नाऊमेद होऊ देणार नाही. राष्ट्रवादी मजबूत करायला पुन्हा एकदा उभे राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले.