सातारा प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रचाराचा भार आपल्या खांद्यावर घेतला आहे. पवार प्रचारासाठी मैदानात उतरणार असून ते राज्यभरात 22 दिवसांत 50 सभा घेणार आहेत. सभांच्या माध्यमातून पवार थेट जनतेत जाणार आहे. एकूण 50 सभांपैकी सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा जिल्ह्यात त्यांच्या तब्बल 5 सभा होणार आहे. या सभांच्या माध्यमातून पवारांची तोफ पुन्हा एकदा जिल्ह्यात धडाडणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरची ही पहिलीच लोकसभा निवडणूक शरद पवार यांच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात आहे. त्यासाठीच राज्यभरातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी 50 सभा घेण्याचा निर्णय शरद पवार यांनी घेतला आहे. पवारांची दोन लोकसभा मतदार संघ महत्वाचे आहेत. त्यामध्ये अनेक सातारा आणि दुसरा बारामती होय. यातील बारामती लोकसभेची निवडणूक ही त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.
बारामतीमध्ये शरद पवार यांच्या सर्वाधिक 8 सभा होणार असून माढा लोकसभा मतदारसंघात 6 तर रावेर आणि साताऱ्यात 5 सभा होणार आहेत. १८ एप्रिलपासून बारामतीतून शरद पवारांच्या सभेला सुरुवात होणार आहे. ११ मेपर्यंत ते राज्यभरात मॅरेथॉन दौरा करणार आहेत. पवारांच्या दिवसाला ३ ते ४ सभा या होणार असून त्या रावेर, शिरूर, बीड, पुणे अहमदनगर, बारामती, माढा, सातारा, कोल्हापूर,औरंगाबाद येथे लोकसभामतदार संघात सभा होणार आहेत.
सातारा जिल्ह्यात या – या दिवशी, ठिकाणी होणार सभा
१) पहिली सभा वाईत : शरद पवार यांची सातारा जिल्ह्यात पहिली सभा ही दि. २४ एप्रिल रोजी सातारा लोकसभा अंतर्गत वाई येथे होणार आहे.
२) दुसरी सभा कोरेगावात : दि. २९ एप्रिल रोजी सातारा लोकसभा अंतर्गत कोरेगाव येथे शरद पवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.
३) तिसरी सभा फलटण-पाटणला : दि. ३० एप्रिल रोजी एकाच दिवशी शरद पवार सातारा जिल्ह्यात दोन ठिकाणी सभा घेणार आहेत. त्यामध्ये एक फलटण आणि पाटण येथील समावेश आहे.
४) चौथी सभा कराडात : दि. ३ मे रोजी सातारा लोकसभा अंतर्गत कराड येथे शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे.
५) पाचवी सभा साताऱ्यात : शरद पवार यांचाही सातारा जिल्ह्यातील शेवटची पाचवी सभा ही दि. ४ मे रोजी सातारा लोकसभा अंतर्गत सातारा येथे जाहीर सभा होणार आहे.