सातारा प्रतिनिधी | दहिवडी (ता. माण) येथे माण खटाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभाकर घार्गे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांची शनिवारी सभा पार पडली. यावेळी ‘माण-खटावमधील जनतेचे प्रश्न निकाली काढण्यासाठी येथील नेतेमंडळी एकत्रित आले आहेत. दोन्ही तालुक्यांतील प्रश्नांची जाण असलेल्या या नेत्यांची जबरदस्त शक्तीच माण-खटाव विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवेल, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, प्रभाकर घार्गे, आ. अरुण लाड, प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, सुनील माने, रणजितसिंह देशमुख, मनोज पोळ, उत्तम जानकर, सुरेंद्र गुदगे, प्रा. कविता म्हेत्रे, नंदकुमार मोरे, अनिल पवार उपस्थित होते.
खा. पवार म्हणाले, दुष्काळाच्या संकटावर मात करण्याची ताकद माण-खटावच्या जनतेत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून येथील महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात आले. त्याचा फायदा येथील तरुणांनी घेतला. आयएएस, आयपीएस, पोलिस अधिकारी म्हणून त्यांची निवड झाली. कर्तबगार अधिकारी म्हणून काम करण्याची येथील मुला-मुलींची तयारी आहे. संकटे आहेत, पण त्याच्यावर मात करण्याची दृष्टी आहे. जिहे कठापूर, टेंभू या योजनांच्या उभारणीसाठी अनेकांनी आपल्या आयुष्यातील महत्वाचा काळ खर्ची घातला. यामध्ये स्वर्गीय आ. सदाशिवराव पोळ, भाऊसाहेब गुदगे, धोंडीराम वाघमारे, केशवराव पाटील, वाघोजीराव पोळ यांनी दुष्काळ हटवण्याच्या लढाईत काही ना काही भूमिका घेतली.
विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने येथील नेते एकत्रित आहेत. हा संदेश या भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. नेत्यांनी एकी अशीच पुढे ठेवावी. चांगल्या कामाची आखणी केली तर प्रश्न निश्चित सुटतील. राज्य आणि केंद्र सरकारची मदत घेऊन प्रश्न सोडवू. अनेक प्रश्न आपल्या समोर आहेत. हातात सत्ता आणि अधिकार पाहिजे, यासाठी जनतेने आमच्याकडे सत्ता सोपवावी, असे आवाहनही खा. पवार यांनी केले.
खा. धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, या सरकारने दहा वर्षांत कंत्राटदार सांभाळण्याशिवाय काही केले नाही. आता कुणाच्या जमिनी कुणाला बळजबरीने घेऊ देणार नाही. यासाठी जिल्हाधिकार्यांकडे बैठक लावू. माण-खटावचे अपुरे सिंचन प्रकल्प मार्गी लावणार आहे. आता नेत्याच्या सांगण्यानुसार नाही तर जनतेच्या इच्छेनुसार पाणी मिळेल, असा दबाव प्रशासनावर ठेवू. वडजल सभेत अनेक ज्येष्ठ मंडळींचे स्मरण झाले. जेवढे माजी आमदार झाले त्यांचा वाटा प्रकल्प उभारण्यात आहे. फित कापायला काय कोणीही येईल. सध्याचे आमदार हे महसूल आणि पोलिस प्रशासनाचा पुरेपुर उपयोग करतात.
म्हसवडमध्ये मिथुन लोखंडे हा कार्यकर्ता महाविकास आघाडीसाठी काम करतो म्हणून त्याच्या घरी 40 पोलिस घेऊन धाड घालण्यात आली. पोलिसांच्या माध्यमातून दहशत माजवली गेली. बिदालमध्ये एकाला मारहाण झाली. 48 तास गुन्हा दाखल करायला लागली. पोलिस प्रशासन हे जनतेचे नोकर आहेत, हे त्यांनी विसरु नये. हे थांबलं नाही तर जनता कलेक्टर आणि एसपी ऑफिसरला घेऊन येईन. साहेबांवर टीका करण्याची योग्यता तरी समोर उभ्या असलेल्या उमेदवाराकडे आहे का? माण-खटावच्या जनतेनेच चांगली पिढी घडवायची की शिवराळ लोकांच्या हाती सत्ता द्यायची, हे ठरवायचे आहे.
प्रभाकर घार्गे म्हणाले, मी काय आहे, ते माण खटावला माहित आहे. आणि गोरे काय आहेत ते सर्वांना माहित आहे. माण- खटावला घातक प्रवृत्ती आपल्याला थांबवावी लागणार आहे. दहशतीला कोणी घाबरु नये. आम्ही कुणाच्या वाटेला जात नाही, गुंड व्हायला बुध्दी लागत नाही. जनतेच्या केसाला धक्का लागला तर आम्ही जबाबदार आहे. तालुक्याच्या भल्यासाठी काम करायचे आहे, असेही घार्गे म्हणाले.
यावेळी प्रभाकर देशमुख, अनिल देसाई, उत्तम जानकर, अभयसिंह जगताप, रणजितसिंह देशमुख, सुरेंद्र गुदगे, कविता म्हेत्रे यांची भाषणे झाली.