शरद पवार पुण्यातील पक्ष कार्यालयात दाखल; बैठकीतून सातारा जिल्ह्यासह वाई मतदार संघाचा घेणार आढावा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. येणाऱ्या निवडणुकीची रणनिती आखण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज पुण्यात आढावा बैठक घेत आहेत. या बैठकीसाठी पुण्यातील पक्ष कार्यालयात पवार दाखल झाले असून या बैठकीत सातारा जिल्हयाचा ते आढावा घेणार आहेत. वाई विधानसभा मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील हे अजित पवार गटात गेल्याने त्यांच्या मतदारसंघा संदर्भात मोर्चेबांधणी करण्याबाबत चर्चा करणार आहेत.

शरद पवारांच्या भावनिक बंधनामध्ये अडकलेले वाई, खंडाळा, महाबळेश्वर मतदार संघाचे आमदार मकरंद पाटील वर्षभरापूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटात सामील झाले. किसन वीर आणि खंडाळा सहकारी कारखाना वाचविण्यासह मतदार संघाच्या विकासासाठी मकरंद पाटलांनी निर्णय घेतल्याची त्यावेळी चर्चा होती. मात्र, लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीतील उमेदवार शशिकांत शिंदे यांना वाई मतदार संघातून दहा हजार मतांची आघाडी मिळाली.

लोकसभा निवडणुकीवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या सभेनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला होता. आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयासाठी वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यातील निष्ठावंत कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. त्यामुळे शिंदे यांना त्याचा चांगला फायदा झाला. त्यांना वाई मतदारसंघातून सर्वाधिक 6 हजार 743 मताधिक्य मिळाले. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांना पुन्हा जोर लावावा लागणार हे मात्र नक्की आहे. शरद पवार यांनी जर वाई विधानसभा मतदार संघात उमेदवार दिला तर मकरंद पाटील यांच्यासाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. आता पवार वाई विधानसभा मतदार संघात कोणाला संधी देणार हे पहावं लागणार आहे.