खासदार शरद पवारांची अविनाश मोहितेंशी चर्चा; मोहितेंनी दिली ‘ही’ अनोखी भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी । साताऱ्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत सकाळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम पार पडले. या कार्यक्रमानंतर कालेतील कार्यक्रमास जाण्यापूर्वी शरद पवारांनी रेठरे बुद्रुक येथील कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे निवासस्थानी जाऊन भेट दिली. यावेळी त्याच्याशी चर्चा झाल्यानंतर मोहितेंनी तब्बल पाच दशकापूर्वी पुण्यात झालेल्या कार्यक्रमाचे छायाचित्र पवार यांना भेट दिली. या अनोख्या भेटीला पाहताचा पवार चांगलेच आनंदी झाल्याचे पहायला मिळाले.

रेठरे बुद्रूक येथील राष्ट्रवादीचे नेते व कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी खा. पवार यांनी भेट दिली त्यावेळी मोहिते कुटूंबानी १९७५ मध्ये झालेल्या कार्यक्रमाचे छायाचित्र श्री. पवार यांना भेट दिले. तत्कालीन मुख्यमंत्री ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, अविनाश मोहिते यांचे आजोबा आबासाहेब मोहिते, एम. डी. निंबाळकर आदींसह अन्य जुन्या सहकाऱ्यांसोबत तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार यांचा त्या छायाचित्रात समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा =मिळाला.

अविनाश मोहिते यांच्याशी भेट झाल्यानंतर शरद पवार यांनी कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधला. यावेळी पवार म्हणाले की, मोहिते कुटूबियांसह राष्ट्रवादीवर प्रेम करणाऱ्या आपल्यासारख्या लोकांमुळे आम्हाला बळ मिळते. अगदी अल्पावधीच्या भेटीसाठी मी रेठऱ्यात आलो असतानाही आपण सर्वांनी एकत्रीत येऊन माझ्या स्वागतासाठी केलेल्या गर्दीमुळे मला आनंद झाला. अशाच पध्दतीने आपण सर्वजण अविनाश मोहिते व त्यांच्या कुटूंबियासोबत राहावे. मोहिते यांच्या पाठिशी राष्ट्रवादीची ताकद पूर्ण ताकदीने आम्ही उभा करत आहोत. रेठऱ्याच्या गावाला वेगळे ऐतिहासिक महत्व आहे. तो सगळा वारसा जपण्यासाठी आपण सर्वांना समर्थपणे उभे रहायचे असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.

आज दुपारी रेठरे बुद्रुक येथील मोहितेंच्या गृह भेटीवेळी माजी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, पाटणचे सत्यजितसिंह पाटणकर, जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रवादीच्या आयटीसेलचे सारंग पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, संगीता साळुंखे, मानसिंगराव पाटील, अॅड. रवींद्र पवार, प्राचार्य मोहन राजमाने आदी उपस्थित होते.