सातारा प्रतिनिधी | फक्त तीनच महिने थांबा, महाविकास आघाडीच्या माध्यमातून खटाव-माणचे चित्र बदलेल. येथील सर्व पाणी योजना पूर्णपणे मार्गी लावतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ग्रामविकासाचा दृष्टिकोन रयत शिक्षण संस्थेच्या सर्वच शाखांमधून आम्ही पुढे नेला, असे प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केले.
निढळ, ता. खटाव येथील हनुमान विद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, खा. रामशेठ ठाकूर, व्हाईस चेअरमन ऍड. भगीरथ शिंदे, विकास देशमुख, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव मस्के, ऍड. रवींद्र पवार, डॉ. सदाशिव कदम, जे. के. जाधव, डॉ. मुमताजअली शेख, डॉ. विठ्ठल शिवणकर, बी. एन. पवार, डॉ. शिवलिंग मेनकुदळे, नवनाथ जगदाळे. डॉ. राजेंद्र मोरे उपस्थित होते.
खा. शरद पवार म्हणाले, अनेक वर्षे निढळमध्ये येण्याचा विचार होता. आज रयतच्या कार्यक्रमानिमित्ताने येणे झाले आणि येथील पाणलोटसह ग्रामविकासाची कामे पाहून आनंद झाला. हनुमान विद्यालयाच्या वास्तूत आमूलाग्र बदल करुन सर्व सोयीसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. या अत्याधुनिक इमारतीने आदर्श निर्माण केला आहे. दुष्काळावर सामूहिक प्रयत्नातून मात करणारी कामगिरी दळवी व त्यांच्या सहकऱ्यांनी केली आहे.
खा. रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेला शंभर कोटींहून अधिकची मदत केली आहे. खा रामशेठ ठाकूर यांचे सारखे दानशूर लोक असल्याने संस्थेचे अनेक प्रश्न सुटत आहेत. खटाव-माण तालुक्यातील अनेक लोक प्रशासनात मोठ्या हुद्यावर काम करत आहेत. सत्तेचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे थोरा मोठ्यांचे उद्दिष्ट आपणही पुढे नेणे गरजेचे आहे.
शाहू-फुले- आंबेडकरांनी त्या काळात विज्ञानवादाचा विचार पेरला होता. समाजात जागृती करण्याचे व्रत त्यांनी जोपासले. दुष्काळावर मात करण्याची आणि शेतीला जोडधंदे निर्माण करण्याची संकल्पना त्यांनी राबवली. रयत संस्थेतील विद्यार्थ्यांना अशा थोर लोकांचे विचार आणि माहिती करुन द्यायला हवी, अशी अपेक्षाही खा. पवार यांनी व्यक्त केली.
चंद्रकांत दळवी यांनी सांगितले दानशूर व्यक्तीमुळे रयत शिक्षण संस्था घडली. निढळ येथील निर्मळ समाजाने 10 एकर रोड टच सातारा सोलापूर हाय वे नजीकची जमीन शाळेसाठी दान केली. येथील ग्रामस्थांनी व मुंबई नोकरदार व्यावसायिक संघटना यांनी गावाला व शाळेला खूप मोठी मदत केली. हनुमान विद्यालयाची नूतनीकृत करण्यात आलेली अद्यावत सुविधांनी युक्त इमारत संपूर्ण राज्याला आदर्श रोलमॉडेल ठरणार आहे.