कराड प्रतिनिधी | काही दिवसांतच विधानसभा निवडणूक जाहीर होणार असल्यानं नेत्यांचे दौरे सुरू आहेत. शरद पवारही रविवारी सातारा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीच्या निकालासंदर्भात सूचक वक्तव्य केलं आहे. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमांसाठी खा. शरद पवार रविवारी सातारा दौऱ्यावर आले होते. रयत संस्थेच्या शाळा इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना ‘राज्यातील परिस्थिती दोन महिन्यात बदलेल’, असं सूचक विधान त्यांनी केलं आहे. कराड तालुक्यातील काले गावात ते बोलत होते.
राज्यात सत्ता बदलाचे दिले संकेत
शरद पवार म्हणाले की, रयत शिक्षण संस्थेनं एवढं मोठं काम केलं आहे. त्या संस्थेचा सन्मान करायचा असेल तर सरकारने संस्थेला मोठी देणगी द्यायला हवी. तसंच त्याची तरतूद बजेटमध्ये करावी, अशी सूचना मी आमची सत्ता असताना तत्कालिन सरकारला केली होती. माझा सल्ला सरकारमधील त्यावेळचे अर्थमंत्री अजित पवारांनी मान्य करून बजेटमध्ये ५ कोटींची तरतूद केली. त्यापैकी ३ कोटी संस्थेकडं वर्ग केलेले आहेत. येत्या दोन महिन्यात परिस्थिती बदलेल आणि तुम्ही ती बदलाल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शालेय सुधारणांसाठी १ कोटी देणार
कराड तालुक्यातील काले गावच्या ग्रामस्थांनी ७२ लाख रूपये वर्गणीतून रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयाची सुसज्ज इमारत बांधली आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना शरद पवार म्हणाले की, शाळेतील आधुनिक सुधारणांसाठी ग्रामस्थांनी ५० लाख रूपयांची मदत संस्थेकडे मागितली आहे. संस्था आणि अन्य मार्गाने आम्ही १ कोटी रूपये देऊ.
रेठऱ्यातील गर्दीने शरद पवार भारावले
कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या निवासस्थानी शरद पवारांनी भेट दिली या अल्पकाळाच्या कौटुंबिक भेटीदरम्यान देखील मोहिते समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे शरद पवार भारावरून गेले. अविनाश मोहितेंवर असंच प्रेम ठेवा, असं आवाहन त्यांनी केलं.