सातारा प्रतिनिधी । “आज शिक्षणक्षेत्रात प्रचंड बदल होत आहेत. आधुनिकता आली, टेक्नॉलॉजी आली. या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून जगात मोठ्या प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसत आहेत. ज्यांच्यासाठी अण्णांनी काम केले त्यांना या आधुनिक तंत्रज्ञानापासून दूर ठेवता येणार नाही. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा रयतच्या शाळांना देणार असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी केले.
पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील याच्या १३७ व्या जयंती समारंभास आज शरद पवार यांनी उपस्थिती लावली. यावेळी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी, व्हाइस चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, रामशेठ ठाकूर, अरुण कडू पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, सचिव विकास देशमुख, सहसचिव उच्च शिक्षण विभागाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव माध्यमिक विभागाचे श्री.बी.एन.पवार, ऑडीट विभागाचे सहसचिव प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे, कर्मवीर कुटुंबीय, प्रभाकर देशमुख, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार सुमन पाटील अॅड.रवींद्र पवार व अॅड. दिलावर मुल्ला, संगीता पाटील, जे.के. जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी खा. पवार म्हणाले, “एक काळ असा होता शैक्षणिक क्षेत्रापासून बहुजन समाज हा दूर होता. पण शाहू महाराज यांच्यासारखे द्रष्टे राज्यकर्ते यांनी नेहमी भविष्यातील शिक्षणाचा विचार केला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी बहुजनांच्या शिक्षणाचा आणि सावित्रीबाई फुले यांच्या माध्यमातून स्त्री शिक्षणाचा विचार मांडला. पुढे हाच आदर्श ठेवून उपेक्षितांच्या समाजासाठी लोकांत जागृती व अधिकाराची जाणीव निर्माण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. कुंभोज, काले ही दोन ठिकाणे कर्मवीरांच्या पदस्पर्शाने आणि त्यांनी हातात घेतलेल्या कार्यामुळे महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्राची ऐतिहासिक स्थळे झाली आहेत, त्याचे सर्व श्रेय कर्मवीरांना द्यावे लागेल.
यावेळी संस्थेचे चेअरमन दळवी म्हणाले की, संस्थेमध्ये अनेक चांगले बदल केले आहेत. एक विभागीय अधिकारी व दोन सहायक विभागीय अधिकारी ही पदे निर्माण केल्याने प्रत्येक शाखेची बारकाईने काळजी घेता येते. शिक्षक आणि शिक्षकेतर सेवकांचे काही प्रश्न हे न्यायालयीन प्रक्रियेत आहेत, परंतु लवकरच ते प्रश्न सुटतील. पटसंख्या हे आमच्यापुढे मोठे आव्हान आहे, त्याला शिक्षक जबाबदार नाहीत. शैक्षणिक गुणवत्ता चांगली करण्यासाठी डिजीटायजेशन ऑफ स्कूलची गरज आहे. इमारती अपग्रेड होत असून सर्व शाळेत इंटरॅक्टिव्ह पॅनल बोर्ड बसवणार आहोत.
दरम्यान, कर्मवीर जयंती निमित्त साताऱ्यातील रयतच्या शाखेतील रयत सेवक व विद्यार्थी एकत्र येत कर्मवीरांच्या चित्ररथासह प्रभात फेरी सातारा शहरात काढण्यात आली. यावेळी समाजसुधारकांच्या पुतळ्यांना पदाधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.