सातारा प्रतिनिधी | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत काल रविवारी साताऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी शरद पवार यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीबाबत मोठं विधान केले आहे. ‘तुम्ही कसे निवडून येत नाही हे मी बघतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने इथली निवडणूक आपण जिंकू’ असे विधान पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर केल्याने याची चांगलीच चर्चा सध्या सुरू झाली आहे. शरद पवारांच्या या विधानामुळे आता साताऱ्यात आता ते नेमका कोणता डाव टाकणार? हे पहावे लागणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर आता महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचचे बिगुल वाजणार आहे. विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होतील असा अंदाज वर्तवला जात असून या दृष्टीने सर्वच पक्षा कामाला लागले आहेत. सातारा जिल्ह्यात देखील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व काँग्रेस पक्षातील स्थानिक नेत्यांकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे कार्यक्रम घेतले जात आहेत. पश्चिम महाराष्ट्र आणि प्रामुख्याने सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रवादीची ताकद काही प्रमाणात विभागली आहे. त्याचा फटका नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला.
मात्र, आता विधानसभा निवडणुकीत शरद पवार गट चांगलाच तयारीला लागला आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी शरद पवार यांनी साताऱ्यात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसमोर बोलताना पवार म्हणाले, “तुम्हाला एवढंच सांगतो की, तुम्ही एकत्र राहा, तुम्ही कसं निवडून येत नाही ते मी बघतो. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने इथली निवडणूक आपण जिंकू. काही दिवसांत सगळे एकत्र बसून चर्चा करून मला येऊन सांगा की आम्ही एक झालो आहोत हे . तसंच आमच्यापैकी कुणालाही तुम्ही संधी द्या, त्याच्यासाठी आम्ही काम करु एवढं तुम्ही मला सांगा. या तालुक्याचा चेहरा बदलेल याची खात्री मी तुम्हाला देतो.” असे म्हंटले.