सातारा प्रतिनिधी | पुणे येथे वाई विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांची काल महत्वाची बैठक पार पडली. यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रोखठोक भूमिका मांडली. वाई विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत तुतारी चिन्हावरच उमेदवार उभा केला जाणार आहे. विद्यमान आ. मकरंद पाटील यांचा विषय आता सोडून देवू. त्यांच्या परतीचे मार्ग बंद केले आहेत, अशी रोखठोक भूमिका राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खा. शरद पवार यांनी व्यक्त केली.
पुण्यात पार पडलेल्या बैठकीला साताऱ्यातून डॉ. नितीन सावंत, वाई तालुकाध्यक्ष दिलीप बाबर, खंडाळा तालुकाध्यक्ष रमेश धायगुडे, सातारा लोकसभा मतदारसंघाचे युवक अध्यक्ष विजयसिंह पिसाळ, अॅड. निलेश डेरे, नितीन भिलारे, प्रसाद सुर्वे, माजी उपसभापती अनिल जगताप, प्रताप यादव यांच्यासह तिन्ही तालुक्यांतील कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत खा. पवार म्हणाले, सातारा जिल्हा हा यशवंत विचारांचा जिल्हा आहे. या विचारांशी फारकत घेणाऱ्यांना जिल्ह्यातील जनता कधीच स्वीकारणार नाही. त्यामुळे आपल्याला सोडून गेलेल्यांचा विषयही सोडून देवूया. एनसीडीसीचा मीही प्रमुख होतो. राज्य शासनाने किसन वीर कारखान्याला थक हमी दिली असली तरी ते सभासदांच्या डोक्यावर एक प्रकारे कर्जच आहे. विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी मिळून पुन्हा पक्ष उभा करु.
दिलीप बाबर म्हणाले, लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही चांगले काम केले. आ. मकरंद पाटील यांच्या पुतण्याच्या लग्नासाठी प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आणि आ. शशिकांत शिंदे यांनी आपल्याकडे आग्रह धरल्याने पवारसाहेब तुम्ही विवाह सोहळ्याला उपस्थित राहिलात. लोकसभा निवडणुकीत आ. मकरंद पाटील हे आ. शिंदे यांना मदत करणार होते. पण त्यांनी ती केली नाही. कोल्हापूरचे सर्व कार्यक्रम रद्द करुन तुम्ही विवाह सोहळ्यासाठी आला नसता तर आ. शिंदे यांचा पराभव झाला नसता. अजूनही विद्यमान आमदार कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करत आहेत. पवारसाहेब आपल्या पाठिशी असल्याचे ते सांगत फिरत असून याबाबत तुम्ही वाईत येऊन भूमिका स्पष्ट करावी.
अॅड. निलेश डेरे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत वाई विधानसभा मतदार संघातील प्रत्येक बुथवर जर दहा मते जादा मिळाली असती तरी आ. शशिकांत शिंदे हे निवडून आले असते. आता विधानसभा निवडणुकीसाठी मायक्रोप्लॅनिंग करणे जरुरीचे आहे. आपल्या पक्षाला बुथ कमिट्यांची पुनर्रचना करावी लागणार आहे.
रमेश धायगुडे म्हणाले, भारताला स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे उलटली असली तरी खंडाळा तालुका राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झालेला नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाने खंडाळा तालुक्याला उमेदवारी द्यावी. खंडाळा साखर कारखान्याला १५० कोटींची थकहमी मिळाली असल्याने आता खंडाळा कारखाना किसन वीर पसाखर कारखान्यापासून वेगळा करण्यासाठी पवार साहेबांनी प्रयत्न करावेत. बैठकीमध्ये तिन्ही तालुक्यांतील स्थानिक नेत्यांनी विद्यमान आमदारांविषयी तक्रारी मांडल्या. त्यावर मला त्यासाठी वाईत यावंच लागणार आहे, सर्व कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रमावस्था निश्चितपणे दूर केली जाईल, असेही खा. पवार या बैठकीत म्हणाले.