निष्ठावंत शिलेदारासाठी शरद पवार साताऱ्यात दाखल; ‘मविआ’तर्फे जोरदार शक्तिप्रदर्शनाने शिंदेंच्या उमेदवारीचा भरणार अर्ज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा लोकसभा निवडणूक २०२४ (Satara Lok Sabha Election 2024) साठी महाविकास आघाडीतर्फे निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून आमदार शशिकांत शिंदे याना उमेदवारी देण्यात आली आहे. या निष्ठावंत शिलेदाराला खंबीर पाठबळ देण्यासाठी स्वत: शरद पवार साताऱ्यात दाखल झाले आहेत. त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांसह महारॅलीच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आमदार शशिकांत शिंदे यांचा सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे.

साताऱ्यात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले असून शरद पवार यांच्या या दौऱ्याचे महाविकास आघाडीच्‍या वतीने जोरदार नियोजन करण्‍यात आले आहे. पवार दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास हेलिकॉप्‍टरने सैनिक स्कूलच्या मैदानावर दाखल झाले. येथून ते वाहनाने गांधी मैदान येथे आले असून तेथे पवार यांच्या उपस्थितीत शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्‍यासाठी महारॅलीस प्रारंभ केला जाणार आहे. या महारॅलीसाठी त्‍यांच्‍यासोबत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार पृथ्‍वीराज चव्‍हाण, बाळासाहेब पाटील यांच्‍यासह महाविकास आघाडीतील सर्व पक्षांचे वरिष्‍ठ नेते व पदाधिकारी उपस्‍थित राहिले आहेत.

शशिकांत शिंदेंची पवारांचे निष्ठावान शिलेदार म्हणून ओळखले

सातारा लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देण्‍यात आली आहे. शिंदे हे पवारांचे निष्ठावान शिलेदार म्हणून ओळखले जातात.
पवारांचा शब्द प्रमाण मानून कोणत्याही निवडणुकीत उतरण्यास ते मागे-पुढे पाहात नाहीत. पक्षाच्या अडचणीच्या काळात ते नेहमी शरद पवारांसोबत भक्कमपणे उभे राहिले आहेत. अशा निष्ठावान कार्यकर्त्याच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्यासाठी तसेच आत्तापर्यंत नेहमी त्यांना साथ देणाऱ्या सातारा लोकसभा मतदारसंघातील जनतेला साद घालण्यासाठी शरद पवार साताऱ्यात दाखल झाले आहेत.

निष्ठावंताचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर पवार काय बोलणार?

सातारा लोकसभा मतदार संघासाठी आमदार शशिकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आज भरला जाणार असून यासाठी स्वतः शरद पवार साताऱ्यात दाखल झाले आहेत. आपल्या निष्ठावंत शिलेदाराचा अर्ज भरल्यानंतर ते नेमकं काय बोलणार? कुणावर निशाणा साधणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.