यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी आज काका-पुतण्या प्रीतिसंगमावर आमनेसामने येणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी. यानिमित शरद पवार काल रविवारी कराडात दाखल झाले आहेत. सोमवारी सकाळी अजित पवार देखील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावर येणार आहेत. त्यामुळे काका-पुतण्या आमनेसामने येणार का? याचीच सर्वांना उत्सुकता आहे.

शरद पवारांनी टायमिंग साधलं

विधनासभा निवडणुकीचा शनिवारी निकाल जाहीर झाला. त्यात महाविकास आघाडीचं पानिपत झालं तर महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलं. मविआच्या अनेक मातब्बरांचा दारूण पराभव झाला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला देखील मोठा फटका बसला. या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार कराडमध्ये दाखल झाले. पत्रकार परिषदेत त्यांनी महायुतीच्या विजयाची आणि मविआच्या पराभवाची कारणं सांगितली.

यशवंतरावांच्या स्मृतीदिनाला शरद पवारांची अनेकदा दांडी

शरद पवार यापूर्वी बऱ्याचदा यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनी प्रीतिसंगमावर आले नव्हते. पक्ष सत्तेत असताना त्यांची गैरहजेरी अनेकदा दिसून आली होती. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर त्यांनी तातडीने कराड गाठलं. ही बाब देखील सध्या चर्चेत आहे.

काका-पुतण्याच्या दौऱ्याकडं लक्ष

उपमुख्यमंत्री अजित पवार सोमवारी सकाळी ७ वाजता कोल्हापूर विमानतळावर दाखल होणार आहेत. तेथून मोटारीने ते ८ वाजता कराडात येऊन यशवंतरावांच्या समाधीला अभिवादन करतील. त्यानंतर पुन्हा कोल्हापूरला जाऊन तेथून विमानाने ते मुंबईला रवाना होणार आहेत. निवडणुकीत कुटुंबातच संघर्ष झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार हे काका पुतणे उद्या प्रीतिसंगमावर येणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.