कराड प्रतिनिधी । “आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी कारखानदारांनी गतवर्षीची शिल्लक रक्कम देण्यासह यंदा गाळप होणाऱ्या उसाला ४ हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी. ती दिली नाही तर कारखानदारांसह नेत्यांच्या सभा विधानसभा निवडणुकीत उधळून लावू, असा इशारा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकर गोडसे यांनी दिला आहे.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात आज शेतकरी संघटनेचे नेते शंकरराव गोडसे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी संघटनेचे सातारा, सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गोडसे म्हणाले की, यावर्षी साखर आयुक्तांपुढे एक जी बैठक झाली त्या बैठकीत ऊसाला ३ हजार १०० रुपये पहिली उचल देण्याचे कारखानदारांनी मान्य केले होते. मात्र, जिल्ह्यातील कारखानदारांनी २ हजार ८०० ते ३ हजार १०० रूपयांच्या घरातच शेतकऱ्यांना पैसे दिले आहेत. आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी कारखानदारांनी गतवर्षीची शिल्लक रक्कम देण्यासह यंदा गाळप होणाऱ्या उसाला ४ हजार रुपये पहिली उचल जाहीर करावी. अन्यथा, कारखानदारांसह नेत्यांच्या सभा उधळून लावणार आहे. गतवर्षी गळीत झालेल्या उसाला ३ हजार १०० रुपये देण्यात यावे असे आदेश साखर आयुक्त व जिल्हाधिकारी यांनीही काढले होते.
यंदा वर्षभर साखरेचा दर ४० रूपयाहून अधिक राहिला आहे. कारखानदारांनाही त्यामुळे ४ हजार दर देणे फारसे अवघड नाही. गत काही वर्षात महागाई वाढली असून त्याचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यां चा उत्पादन खर्च वाढला असून शेतकऱ्यांना शेती करणे परवडतच नाही. कारखानदारांनी आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच यंदा गाळप होणाऱ्या उसाला पहिली उचल जाहीर करावी. मगच कारखाने सुरू करावेत, अशी मागणी गोडसे यांनी केली आहे.