BRS जिल्ह्यातील आगामी सर्व निवडणुका लढवणार; शंकरराव गोडसे यांचं मोठं विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी : तेलंगणाचे राज्य सरकारने मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. त्यामुळे शेतीबाबत तेलंगणा पंजाबच्याही पुढे गेले आहे. महाराष्ट्रातील शेतकरीही या पक्षाकडे आकर्षित होत असून आगामी काळात येणाऱ्या सातारा लोकसभेसह जिल्हय़ातील आठही विधानसभा मतदारसंघ तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका BRS (भारत राष्ट्र समिती) लढवणार आहे. बीआरएस हा कोणत्याही पक्षाची बी टीम नसल्याचे पक्षाचे नेते शंकरराव गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी BRS पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी BRS च्या पाटण विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार तथा सुपनेच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप साबळे, कराड तालुका अध्यक्ष यासीन पटेल, अमित यादव, रवी माने, बाबासाहेब जाधव हे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गोडसे म्हणाले की, तेलंगणा सरकारने गेली दहा वर्षे शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या आहेत. शेतीबाबत तेलंगणा हे आता मॉडेल बनले आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र सधन असतानाही सिंचन, शेतीचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तेलंगणा राज्यात शेतकऱयांसाठी मोठे काम होत असेल तर ते महाराष्ट्रात का होत नाही? तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी राबवलेला जाहीरनामा घेऊन आम्ही निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. तेलंगणामध्ये शेतकऱ्याना मोफत वीज मिळते. ही वीज दिवसा दिली जाते. घरगुती तसेच शेतीची अखंडपणे 24 तास सुरू असते. शेतकऱ्यांसाठी पिकवलेला माल खरेदी करण्यासाठी 7300 खरेदी केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.

तेलंगणामध्ये तलाठी ही यंत्रणा अस्तित्वात नाही. शेतीतील कामामुळे तेलंगणा राज्य संपूर्ण देशापुढे आदर्शवत होत आहे. तेलंगणा राज्यातील शेतीबाबतचे उपक्रम आम्ही स्वत: तेथे जाऊन पाहिले आहेत. मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची आपण भेट घेतली आहे. त्यांच्या कार्यामुळे प्रभावित होऊन आम्ही सर्वजण भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाच्या माध्यमातून शेतकऱयांच्या हितासाठी लढण्याचे ठरवले आहे. मी शेतकरी चळवळीतून अनेक वर्षे काम केले आहे. अनेक सरकारे पाहिली आहेत. मात्र शेतकऱयांचे प्रश्न सुटले नाहीत. त्यामुळे शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करणाऱया बीआरएस पक्षात प्रवेश केला असल्याचे गोडसे म्हणाले.

https://fb.watch/lGTxs4Nm1P/?mibextid=Nif5oz

सिंचनासाठी 70 हजार कोटी खर्च होऊनही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाहीत : गोडसे

महाराष्ट्रात काँग्रेससह भाजप महाराष्ट्रातील इतर कोणत्याही पक्षाने आजवर शेतकऱ्यांसाठी होणारी लूट थांबवलेली नाही. शेतकऱ्यांसाठी लढताना अनेक केसेस अंगावर घेतल्या. आता शेतकऱ्यांसाठी काम करणारा पक्ष आला आहे. बीआरएसने केवळ घोषणाबाजी केलेली नाही. गेली दहा वर्षे शेतकऱ्यांसाठी काम केले आहे. तेलंगणामध्ये जे झाले, ते 70 वर्षात महाराष्ट्रात का झाले नाही? सिंचनासाठी सुमारे 70 हजार कोटी रूपये महाराष्ट्रात खर्च झाले. तरीही शेतकऱयांचे प्रश्न सुटले नाहीत, अशी टीका गोडसे यांनी केली.

पाटणमधून लढण्याची तयारी सुरू : सुरेखा पाटील

आपण स्वत: मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली आहे. सरकारचे कामही पाहिले आहे. त्यांनी मला पाटण विधानसभा मतदारसंघातून विधानसभा लढवावी, असे सांगितले आहे. त्यामुळे मी निवडणुकीची तयारी सुरू केली असल्याचे माजी जिल्हा परिषद सदस्या सुरेखा पाटील यांनी सांगितले.