कराड प्रतिनिधी । पावसाने दडी मारल्यामुळे तलावांतील पाण्याची पातळी खालावली आहे. तर कोयना धरणाच्या जलाशयात फक्त १०.८२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, आजपासून पायथा वीजगृहातून होणारा १ हजार ५० क्युसेस पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या भेडसावणार हे नक्की या पार्श्वभूमीवर शहरात पाणीपुरवठा करताना तो कमी स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत पाणी पुरवठा विभागातर्फे तसे परिपत्रक काढण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी ‘हॅलो महाराष्ट्र’शी बोलताना दिली.
कराड शहरातील पाणी पुरवठ्याबाबत घेतलेल्या निर्णयाविषयी मुख्याधिकारी खंदारे म्हणाले की, सोमवार दि. 26 जून पासून सकाळी व सायंकाळी 15 मिनिटे पाणी पुरवठा कमी केला जाणार आहे. तेव्हा नागरिकांनी याची दखल घेऊन पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा आणि पालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत व उन्हाळ्याची तीव्रता वाढत चाललेली आहे. सरासरी सात जूननंतर आपल्याकडे पावसाळा सुरू होतो. परंतु यावर्षी 23 जून अखेर अद्याप पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे कराड शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या कोयना धरणात खूप कमी पाणीसाठा शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाई निवारण करिता विशेष कृती आराखडा करून त्याच्या अंमलबजावणी करण्याबाबत शासनाकडून सूचना मिळाल्या आहेत.
तसेच जलसंपदा विभागाकडून नळ पाणीपुरवठा योजनेस पिण्याचे पाणी वापरास कोयना नदीतून पाणी उचलण्यास मान्यता मिळालेल्या पाणी कोटापैकी सुमारे 60 टक्के पाणी कोटा वापरून पूर्ण झालेला आहे. त्यामुळे नदीतून पाणी उचलण्यासाठी उर्वरित पाणी कोटा जपून वापरणे आवश्यक आहे. म्हणजे तो पाणी कोटा जास्त दिवस पुरेल. अन्यथा नगर परिषदेस भीषण पाणीटंचाईस सामोरे जावे लागेल. याकरिता पाणी कपात करणे हे आवश्यक आहे.
सध्या स्थितीत पाणी कपात करून पाण्याचा वापर कमी केला तर भविष्यात पाऊस पडेपर्यंत सदरचा पाणीपुरवठा पुरेल. त्यामुळे कराड नगर परिषदेमार्फत केला जाणाऱ्या पाणीपुरवठा वेळेत 26 जून पासून सकाळी व सायंकाळी पंधरा मिनिटे कमी केला जाणार आहे. तरी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा वापर काटकसरीने करावा. पिण्याच्या पाण्याची बचत करावी व नगरपरिषद सहकार्य करावे, असे पाणी पुरवठा विभागाने काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.