जिल्हा वार्षिक योजनेतील कामांबाबत पालकमंत्री देसाईंचे यंत्रणांना निर्देश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सन 2024-25 चा 671कोटी 63 लाख रुपयांचा निधी अर्थसंकल्पीत असून यापैकी 223 कोटी 51 लाख 94 हजाराचीतरतूद बीडीएसवर प्राप्त झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 97 कोटी 41 लाख 65 हजार रुपये कामांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मोठ्या रक्कमेची प्रशासकीय मान्यता जुलै महिन्याच्या सुरुवातीसच वितरित करण्यात सातारा जिल्हा राज्यात अग्रेसर आहे, असे सांगुन जिल्हा वार्षिक योजनेतूनप्राप्त तरतुद विहीत मुदतीत दर्जेदार व गुणवत्तापुर्ण कामांवर खर्च करण्यासाठीसर्व यंत्रणांनी 15 ऑगस्ट पर्यत कार्यादेश निर्गमीत करावेत ,असे निर्देश पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

सातारा जिल्हा नियोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, खा. धैर्यशील मोहिते पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. अरुण लाड, आ. पृथ्वीराज चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, आ. छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, आ. दिपक चव्हाण, जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक समीर शेख, सहायक आयुक्त समाज कल्याण नितीन उबाळे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, जिल्हा वार्षिक योजनेमधील कामे करीत असताना लोक प्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. लोक प्रतिनिधी व समितीचे सदस्य यांच्याकडून कामांच्या याद्या आठ दिवसाच्या आत प्राप्त करुन घ्याव्यात व 15 ऑगस्टपर्यंत निविदा प्रक्रीया पूर्ण करुन कार्यादेश देण्यात यावेत. जे विभाग यामध्ये मागे राहतील त्या विभागाच्या खाते प्रमुखांना जबाबदार धरण्यात येईल.

जिल्हा वार्षिक योजनेच्या एकुण 671 कोटी 63 लाख 58 हजारांच्या आराखड्यामध्ये जिल्हा सर्वसाधारण वार्षिक योजनेसाठी 575 कोटी रुपये, अनुसुचीत जाती घटक कार्यक्रमासाठी 95 कोटी रुपये तर आदिवासी क्षेत्रबाहय घटक कार्यक्रमासाठी 1 कोटी 63 लाख 58 हजारांची तरतुद करण्यात आली आहे. यामध्ये मागील वर्षीच्या कांमाचा स्पील कमी केल्याने 100 ते सव्वाशे कोटी रुपयांची वाढीव कामे मंजूर करुन शकणार आहे. सातारा जिल्ह्याची मॉडेल स्कूल आणि स्मार्ट पीएचसी या योजना राज्यात राबविण्यात येणार आहेत.

सातारा जिल्ह्याच्या या दोन्ही महत्वकांक्षी योजनांवर जिल्हा वार्षिक योजनेतून सुमारे 150 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.15 आगस्ट पर्यंत जिल्हयात एक मॉडेल स्कूल आणि एक स्मार्ट पीएचसी यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यााचा मानसही पालकमंत्री यांनी यावेळी व्यक्त केला.

जलसंधारणाच्या अनियमितताआढळलेल्या कामांबाबतचा मुद्दा लोकप्रतिनिधींनी या बैठकीत उपस्थित केला. यावर बोलताना पालकमंत्री देसाई म्हणाले, राज्याच्या कराड शहराचा पाणीपुरवठा तातडीने सुरू व्हावा, यासाठी नॅशनल हायवेचे अधिकारी व जिल्हाधिकारी यांनी त्वरीत जागेवर जाऊन पाहणी करावी असे निर्देशही पालकमंत्री देसाई यांनी यावेळी दिले.

शहीद तुकाराम ओंबळे स्मारकासाठी 15 कोटी रुपये मंजूर

शहीद तुकाराम ओंबळे यांच्या स्मारकासाठी राज्य शासनाने 15 कोटी रुपयांचा निधी शासन देणार आहे, यावर या बैठकीत अशासकीय सदस्यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. यावर बोलताना पालकमंत्री देसाई यांनी स्मारकासाठी पहिल्या टप्यात 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून आणखीवाढीव निधी ही मंजुर करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.