सातारा प्रतिनिधी । महाबळेश्वर येथील आराम चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याच्या अनुषंगाने पुतळा समितीसोबत पालकमंत्री देसाई यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. यावेळी महाबळेश्वर बाजार पेठेच्या चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा तात्काळ बसविण्यात यावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.
या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्ष समीर शेख, उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, महाबळेश्वर येथे महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी लाखो पर्यटक वर्षभर येत असतात. अशा पर्यटनस्थळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अंत्यत देखणा व दिमाखदार पुतळा असणे आवश्यक आहे. येथील आराम चौकात पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा होता.
त्या ठिकाणी जागा निश्चित करुन पूर्णाकृती पुतळा बसविण्यासाठी महाबळेश्वर नगर पालिकेने तात्काळ बैठक घ्यावी. दोन दिवसाच्या आत चौक सुशोभिकरण व पुतळा तयार करण्यासाठी वास्तुशिल्पकारांकडून डिझाईन तयार करावे. महाबळेश्वर नगर पालिकेच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्याधिकारी यांना दिल्या.