सातारा प्रतिनिधी । सातारा जिल्ह्यामध्ये अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झाले आहे. यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे. तथापि जिल्ह्यामध्ये अतिसाराची कोणत्याही प्रकारची साथ नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
अतिसाराच्या रुग्णांमध्ये वाढ या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री देसाई यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक राहूल जाधव, सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले, सध्या देण्यात आलेली आकडेवारी ही एका दिवसाची नसून या वर्षातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची आहे. असे असले तरी साथींच्या आजाराबाबत पालकमंत्री या नात्याने आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन खबरदारीचे उपाय योजन्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. गावा-गावांतील पाणीपुरवठा योजना व पाणवठे येथे दूषित पाणी मिसळणार नाही याची काळजी घ्या. स्वच्छतादूत व आरोग्य दूत यांनी नियमित पाणी तपासणी करावी. प्रशासनाने साथरोग नियंत्रणासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी. अशा सूचनाही यावेळी पालकमंत्री देसाई यांनी केल्या.
साथीच्या आजारांसाठी जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज : डॉ. प्रमोद शिर्के
पावसाळा व साथीचे आजार यांच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य यंत्रणा सज्ज असून विविध प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी दिली. जिल्हयामध्ये एका दिवसामध्ये 3878 तापाचे रुग्ण आणि अतिसाराचे 1104 रुग्ण आढळून आले असल्याचे वृत्त प्रसिध्द झाले आहे.तथापि ही रुग्ण संख्या माहे जून 2023 व 12 जुलै 2023 पर्यंतचे असून सन 2022 मधील आकडेवारीशी तुलना करता सदरची रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली नाही. सदयस्थितीमध्ये वातावरणामधील बदलामुळे रुग्ण आढळून येत असल्याची माहिती डॉ. शिर्के यांनी दिली आहे.