सातारा प्रतिनिधी | जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. काल सर्वत्र चक्काजाम आंदोलने करण्यात आली. या घटनेवरून विरोधकांकडून शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आज मराठा आरक्षण समिती सदस्य या नात्याने पालकमंत्री तथा राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या आरक्षणाचा मागणीसह अनेक महत्वाच्या विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर मराठा समाजबांधवांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच शांतता राखावी, असे आवाहन मंत्री देसाई यांनी समाजबांधवांना केले.
यावेळी पालकमंत्री देसाई यांनी न्यायालयामध्ये सुरू असलेली प्रक्रिया, न्यायालयात मांडली जाणारी बाजू आदी विषयी खा. उदयनराजे भोसले यांना माहिती दिली. तसेच आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजला देण्यात येणाऱ्या सवलतींविषयीही सविस्तर माहिती देत मराठा समाज बांधवांना शांतता राहण्यासाठी आवाहन करण्याची मागणी केली.
खा. उदयनराजे भोसले यांच्यासोबत झालेल्या चर्चेवेळी खा. उदयनराजेंनी देखील मराठा समाज बांधवांच्या मागण्यांबाबत पालकमंत्री देसाई यांच्याशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते. यावेळी दोघांच्यात चर्चा झाल्यानंतर त्यांनी मराठा समाजाने शांतता राखावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये व आरक्षणाच्या बाबत शासनास सहकार्य करावे असे आवाहन केले.
खा. उदयनराजेंसोबतच्या चर्चेनंतर पालकमंत्री देसाईंनी मराठा समाजबांधवांना केलं 'हे ' आवाहन pic.twitter.com/F0vKR3auNH
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 3, 2023
देसाईंनी घेतला सातारा पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा
खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी सातारा पोलीस विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन त्यांनी बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, सहायक पोलीस अधीक्षक मिना यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याच्या सूचना करून पालकमंत्री देसाई म्हणाले, समाज माध्यमांमधून अफवा पसरवल्या जातात त्यावर विशेष लक्ष ठेवावे. समाजामध्ये शांतता ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत. सरकारची भूमिका लोकांपर्यंत पोहचवावी अशा सूचना मंत्री देसाई यांनी केल्या.