कराड प्रतिनिधी | आजपासून गणेशोत्सवास प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूीवर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून वापरल्या जाणाऱ्या डीजे आणि लेझर शो बाबत महत्वाची माहिती दिली आहे. ‘गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी या उच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या डेसीबलमध्ये सुरु ठेवता येतील. त्यापेक्षा मोठा आवाज असेल तर कारवाई करण्यात येईल. लेझर लाईटला तर जिल्ह्यात परवानगीच देण्यात येणार नाही,’ असे पालकमंत्री देसाई यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
पालकमंत्री मंत्री देसाई यांनी शुक्रवारी कराड येथे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रांताधिकारी अतुल म्हेत्रे, पोलिस उपाधिक्षक अमोल ठाकुर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक के. एन. पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी मंत्री देसाई म्हणाले, गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक त्या उपययोजना केल्या आहेत. त्यासाठी योग्य ती दक्षता घेतली जात आहे. गणेशोत्सवात डीजे, डॉल्बी या उच्च न्यायालयाने घालुन दिलेल्या डेसीबलमध्ये सुरु ठेवता येतील. त्यापेक्षा मोठा आवाज असेल आणि त्याची मीटरवर तीव्रता जास्त आढळली तर पोलिसांकडुन त्यावर कारवाई करण्यात येईल. यंदाच्या गणेशोत्सवात लेझर लाईटला तर जिल्ह्यात परवानगीच देण्यात येणार नाही.
त्या लाईटमुळे अनेकांना डोळ्यांचे आजार झाल्याच्या तक्रारी पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. त्याचा विचार करुन शासनानेच त्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे त्या लाईटला बंदी राहिल. तशा सुचना पोलिसांना दिल्या आहेत. तसे कोठे आढल्यास त्या ताब्यात घेण्यात येतील, असे पालकमंत्री देसाई यांनी म्हंटले.