सातारा प्रतिनिधी | गणेश विसर्जन मिरवणुकीवरील वेळेचं बंधन आणि वाद्यांवरील निर्बंधावरून साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंनी एकमेकांना आव्हान दिलंय. प्रशासनाने नियमांचा बागुलबुवा उभा करून गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालू नये. असे कितीसे पोलीस आहेत. तेवढा पोलीस फोर्स जिल्ह्याला पुरेसा नाही. त्यामुळं इथं पण युपी, बिहारच होईल, या गोष्टीचं पोलिसांनी भान ठेवावं. लाठीचार्ज झाला तर ‘अरे ला कारे’ने उत्तर देता येईल, असं उदयनराजेंनी सुनावलं आहे. उदयनराजेंच्या या आव्हानाला पालकमंत्री शंभूराज देसाईंनी देखील प्रत्त्युतर दिलंय.
साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि पालकमंत्री शंभूराज देसाई या दोघांनी स्वतंत्रपणे माध्यमांशी संवाद साधला. प्रथम उदयनराजेंनी संवाद साधत डॉल्बी वाजवण्यात येणार असल्याचे सांगून टाकले. मुंबई, पुण्यात डॉल्बी वाजविला जात असताना साताऱ्यात याला का बंदी? असा सवाल करत डॉल्बी नियमात राहून वाजवावा, असे म्हंटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन डॉल्बी आणि उदयनराजेंच्या वक्तव्याबाबत सविस्तर भूमिका मांडली. यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, त्यांच्या उदयनराजेंचं वक्तव्य आम्ही तपासून घेऊ. शासनाचे नियम आणि हायकोर्टाचे काय निर्देश आहेत, त्याची माहिती उदयनराजेंना दिली जाईल. कोणी नियम आणि कायद्याचं उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पालकमंत्र्यांनी दिला आहे.
शासन नियमांचा बागुलबुवा उभा करुन, प्रशासनाने गणेशोत्सवाच्या उत्साहावर विरजण घालण्याचा प्रकार करु नये अशी रास्त अपेक्षा आहे. डॉल्बीच्या बाबतीत नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करावी तथापि एखादी बाब करुच नये यासाठी एका मर्यादेपलीकडे अट्टाहास करु नये, गणेश मंडळांना गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे. गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होणार नाही अशी दक्षता प्रशासनाने घ्यावी अशी आवाहनात्मक सूचना आज प्रशासन आणि सर्व संबंधीतांना केली आहे.
सध्या सर्वत्र श्री गणेशाची स्थापना घरगुती स्वरुपांत आणि सार्वजनिक स्वरुपात संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात करण्यात आली आहे. या गणेशोत्सवात कार्यकर्ते युवकांचा उत्साह उदंड आहे. अनेख सार्वजनिक मंडळांनी सामाजिक, सांस्कृतिक देखाव्यांवर भर दिला आहे. येत्या तीन चार दिवसांनंतर या गणेशोत्सवाच्या उत्साहाला उधाण येणार आहे. याकामी प्रशासनाने सार्वजनिक सुरक्षितेसाठी तसेच ध्वनीप्रदुषण इत्यादीबाबत नियमांची अंमलबजावणी निश्चितच सक्षमपणे केली पाहीजे. सुदैवाने सातारचे पोलिस प्रशासन सहकार्यात्मक योगदान देत कायदा व सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्रात अग्रगण्य आहे. तथापि शासन नियमांचा बाऊ करुन, कोणीही कोणत्याही प्रकारे श्री गणेश मंडळांची आणि गणेश भक्तांची मुस्कटदाबी करु नये जिथै चुकेल तेथे समजावून, सहकार्याची भुमिका प्रशासनाची असली पाहीजे अशी रास्त अपेक्षा आहे.
खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे वक्तव्य तपासणार : पालकमंत्री शंभूराज देसाई
खा. उदयनराजे भोसले यांनी डॉल्बीबाबत वक्तव्य केल्यानंतर पालकमंत्री देसाई यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. ज्यातील नियम व हायकोर्टाचे आदेश हे उदयनराजे यांना सांगितले जातील. तसेच इतर जिल्ह्यांमध्ये कायदा काय आहे याची माहितीही उदयनराजेंना अवगत केली जाईल. नियमाच्या बाहेर कुणीही गेलं आणि कायद्याचे उल्लंघन केल्यास पोलीस कडक कारवाई करणार. मग तो कोणीही असो, असे पालकमंत्री देसाई यांनी म्हंटले आहे. याचाच अर्थ पालकमंत्र्यांनी थेट खासदार उदयनराजेंच्या भूमिकेला आव्हान दिले आहे.