कराड प्रतिनिधी । कराड येथील पाणीपुरवठा प्रश्नाबाबतीत झालेल्या नुकसानीस डीपीजैन कंपनी कारणीभूत आहे अशी माहिती कराड येथील नागरिकांकडून मिळालेली आहे. सदर कंपनीस संबंधित विभागाकडून नोटीस देण्यात येई. नोटीसीनंतर देखील त्याची दखल न घेतल्यास डीपी जैन कंपनीवर फौजदारी दाखल करू, असा इशारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज दिला.
कराड येथील नवीन शासकीय विश्रामगृहात कराड मधील संभाव्य पुरपरिस्थितिचा पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत अधिकाऱ्याची आज आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर पालकमंत्री देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी पालकमंत्री देसाई म्हणाले की, डीपी जैन कंपनीच्या बाबतीत दोन ते तीनवेळा तक्रारी आल्या आहेत. कराडात नळपाणीपुरवठा करणारी केबल त्यांच्या कामामुळे त्यांनी तोडली. याबाबत मी प्रांताधिकारी यांना सूचना दिलेल्या असून जिल्हाधिकारी यांच्याशी देखील चर्चा करणार आहे. आपण महसूल प्रशासनाकडून त्यांना ताबडतोब नोटीस देऊन जे काही नुकसान झाले आहे. ते भरून घेण्याची प्रक्रिया करू, यानंतर जर त्यांनी नोटिसीला प्रतिसाद दिला नाही तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा देखील दाखल केला जाईल, असे पालकमंत्री देसाई यांनी म्हटले.