सातारा प्रतिनिधी | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावर लाडकी बहीण योजनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कुठेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव नसल्यमुळे आता शिंदे गटाच्या नेत्यांकडून जाहीर नाराजी व्यक्त केली जात आहे. शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी हे आम्हाला खटकलं असल्याचं म्हणत अजित पवार गटावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांना ‘मुख्यमंत्री’ हा एक शब्द जड नव्हता. केंद्राच्या योजनांमध्ये पंतप्रधान शब्दाचा उल्लेख असतो, तर राज्याच्या योजनांमध्ये मुख्यमंत्री शब्दाचा उल्लेख असतो, असे म्हणत शंभूराज देसाई यांनी संताप व्यक्त केला आहे.
शंभूराजे देसाई यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की,’मंत्रिमंडळातल्या अधिकृत निर्णयाची माहिती दिली जाते किंवा मंत्री देतात. मात्र अंतर्गत गोपनीय चर्चा उघड करणं योग्य नाही. योजना आली ती लोकप्रिय झाली की त्याची चर्चा होते. पण केंद्रातील अनेक योजना या पंतप्रधानांच्या नावे आहे. तसेच राज्यातील ही योजना मुख्यमंत्र्यांच्या नावे सुरू केली आहे.
मात्र, आमच्या घटक पक्षाने प्रचार करताना मुख्यमंत्री हा शब्द वगळला. एक शब्द काय जड नव्हता त्यांना. आम्ही योग्य ते पालन करतो. आमच्या सर्व कार्यक्रमात आम्ही सर्व नेत्यांचे फोटो टाकतो. मात्र राष्ट्रवादी पक्षाकडून तसं झालं नाही. असा दुजाभाव आम्ही केला नाही.. करणार नाही. मात्र घटकपक्षांनी असं करू नये. यावर अजितदादांशी बोलणं झालं नाही. तब्येत बरी नसल्याचं कळलं.. नंतर नक्कीच भेट घेऊन चर्चा करीन.’ असेही मंत्री देसाई यांनी म्हंटले.