कराड प्रतिनिधी | राज्याचे पर्यटनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकताच कराड येथे पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीच्या योजनांवर महत्वपूर्ण विधान केले. भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीच्या महायुतीने विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान, शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते; परंतु लाडक्या बहीण योजनेमुळे राज्य सरकारवर ४० हजार कोटींचा आर्थिक ताण आला असल्याचे मंत्री देसाई यांनी म्हटले.
मंत्री देसाई यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, महाराष्ट्र हे आर्थिक शिस्त पाळणारे राज्य असून, वर्षभरात सरकारचे उत्पन्न वाढल्यानंतर त्या वेळच्या आर्थिक परिस्थितीनुसार कर्जमाफीचा निर्णय सरकार घेईल. राज्याची आर्थिक परिस्थिती एवढीही बिकट नाही; परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली वर्षभरात विविध विभागांचे उत्पन्नाचे स्रोत वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार त्या त्या विभागाचे मंत्री उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न सुरू आहेत.”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत देसाई म्हणाले, ”सातारा जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविल्या जाव्यात, असा माझा प्रयत्न राहील. जेथे ज्या पक्षाचा बालेकिल्ला आहे. तेथे त्यांनी लढावे अशी माझी भूमिका आहे. जिल्ह्यातील चार मंत्री, खासदार, आमदार एकत्र बसून निवडणुकीसंदर्भात निर्णय घेऊ. सातारा जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढत आहे. महायुती सोडून कोणी बाहेर जाऊ नये याची काळजी आम्ही घेत असतो. लवकरच शिवसेनेत जिल्ह्यातील अनेक विविध पक्षांचे पदाधिकारी आमच्या शिवसेना पक्षात प्रवेश करतील, असे मंत्री देसाई यांनी म्हटले.