सातारा प्रतिनिधी | राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी नुकताच सातारा नगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतला. सातारा नगरपालिका हे जिल्ह्याचे ठिकाणी असल्याने स्वच्छ नगरपालिका तसेच गार्डन सिटी होण्यासाठी मोकळ्या जागांच्या ठिकाणी बगीचे विकसित करण्यात यावेत, साताऱ्याला सैनिकी परंपरा आहे. सैन्याच्या रणगाडांची विमानांची प्रतिकृती उभी कराव्यात तसेच जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांची माहिती चित्राद्वारे विविध ठिकाणी प्रकाशित करावीत, अशा सूचना पालकमंत्री देसाई यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
सातारा नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सातारा नगरपालिकेच्या कामकाजाची आढावा बैठक नुकतीच पार पडली. बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, सातारा नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्यासह नगरपालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सन 2022-23 पासून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नगरपालिकेने केलेल्या विकास कामांचा व चालू असलेल्या व नियोजित असलेल्या कामांचा आढावा घेतला. नागरिकांची रस्त्यातील खड्डे, पिण्याचे पाणी, आणि नाले गटांराची स्वच्छता या प्रमुख अडचणी असल्याने सातारा नगरपालिकेने विशेष भर देऊन अडचणी सोडवाव्यात. रस्त्यांची मजबुती राहण्यासाठी काँक्रीट रस्ते करावीत. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीतून होणारी कामे ही दर्जेदार व्हावीत, अशी अपेक्षा यावेळी पालकमंत्री देसाई यांनी व्यक्त केली.